बांदा (प्रतिनिधी) : गोवा सीमेवरील बांदा परिसरातील प्रवाशांच्या गैरसोयीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य श्री. नितीन एकनाथ राऊळ यांनी बांदा-बोरिवली आणि बांदा-ठाणे एस.टी. बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी राज्याचे परिवहन मंत्री यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली
श्री. राऊळ यांनी दिलेल्या पत्रानुसार, बांदा हे गोवा सीमेवरील महत्वाचे व्यापारी, शैक्षणिक व वाहतूक केंद्र आहे. इन्सुली, डेगवे, वाफोली, कास, निगुडे, शेळे, डिंगणे, गाळेल, डोंगरपाल, मोरगाव, पडवे, मांगगाव, तिलवडे, मढूरा येथील हजारो नागरिक नोकरी, शिक्षण आणि उपचारासाठी मुंबई, ठाणे, बोरिवली येथे दररोज ये-जा करतात.
गणेशोत्सव, दिवाळी, गोकुळाष्टमी यांसारख्या सणांमध्ये चाकरमानी मोठ्या संख्येने गावी येतात-जातात. या काळात एस.टी.ची थेट बससेवा सर्वात सुरक्षित, सुलभ आणि परवडणारी असते.
पूर्वी सुरू असलेली बांदा-बोरिवली बस सेवा कोणतेही ठोस कारण न देता बंद करण्यात आली. त्यामुळे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, नोकरदार आणि रुग्ण यांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या प्रवाशांना सावंतवाडी, कणकवली किंवा कुडाळ येथे जाऊन बस पकडावी लागत असल्याने वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाढला आहे.
तसेच सणासुदीच्या काळात खाजगी वाहनचालकांकडून अवाजवी भाडे आकारले जात असल्याने सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा पडत आहे.
राऊळ यांच्या 4 प्रमुख मागण्या:
- बंद करण्यात आलेली बांदा – बोरिवली एस.टी. बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्यात यावी.
- प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन बांदा – ठाणे एस.टी. बस सेवा सुरू करण्यात यावी.
- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढती गर्दी लक्षात घेऊन आवश्यक असल्यास अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करावे.
- बांदा बसस्थानकाला परिसरातील अनेक गावांचे मुख्य वाहतूक केंद्र म्हणून प्राधान्य देऊन अधिकाधिक एस.टी. सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
हे पत्र कणकवली आणि सावंतवाडी एस.टी. आगार व्यवस्थापक यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आले आहे.
गणेशोत्सव जवळ आल्याने ही मागणी लवकरात लवकर मान्य व्हावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.












