उपाध्यक्षपदी विनोद मर्गज; २०२६ ते २०३१ कार्यकारिणी बिनविरोध
ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाचे नूतन अध्यक्ष गजानन सावंत, उपाध्यक्ष विनोद मर्गज यांचा जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासाठी सत्कार करण्यात आला.सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ, सिंधुदुर्गच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठीच्या नूतन कार्यकारिणीची निवडणूक बिनविरोध पार पडली. गुरुवारी सिंधुदुर्गनगरी येथील मंडळाच्या कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत गजानन संभाजी सावंत यांची अध्यक्षपदी, तर विनोद रामचंद्र मर्गज यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी आर. टी. चौगुले यांनी पार पाडले.
निवडीनंतर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष गजानन सावंत आणि उपाध्यक्ष विनोद मर्गज यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना श्री. दळवी यांनी, जिल्ह्यातील सहकारी चळवळ अधिक बळकट करण्यासाठी आणि मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
नवनिर्वाचित अध्यक्ष गजानन सावंत यांनी, बदलत्या काळानुसार सहकारी संस्थांचे सभासद, पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी व कर्मचारी यांना अद्ययावत सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे सांगितले. उपाध्यक्ष विनोद मर्गज यांनीही जिल्ह्यातील सहकारी संस्थांना अधिक सक्षम करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची भूमिका मांडली.
या नूतन संचालक मंडळात विलासराव ऐनापुरे, गजानन गावडे, मधुसुदन गावडे, सुभाष तळवडेकर, केशव नारकर, प्रकाश सावंत आणि सुरेश चौकेकर यांची संचालक म्हणून, तर कुंदा पै आणि प्रज्ञा परब यांची संचालिका म्हणून बिनविरोध निवड झाली. यावेळी जिल्हा सहकार विकास अधिकारी मंगेश पांचाळ यांच्यासह सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, संचालक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.











