वैभववाडी (प्रतिनिधी) : सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी सायंकाळी लोरे परिसराला जोरदार पाऊस आणि चक्रीवादळाचा तडाखा बसला. वादळामुळे अनेक घरांचे व गोठ्यांचे नुकसान झाले असून, अनेक घरांची छप्परे उडाली. फोंडा-वैभववाडी मार्गासह अंतर्गत रस्त्यांवर झाडे मोडून पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. ग्रामस्थांनी तत्काळ रस्त्यावर पडलेली झाडे हटवून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, वीजवाहिन्यांवर झाडे पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
लोरे परिसरात मंगळवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फोंडा-वैभववाडी मार्गावर ठिकठिकाणी झाडे कोसळली. अनेक घरांच्या छपरांचे पत्र, कौले उडाल्याने घरांचे नुकसान झाले, तर काही गोठ्यांनाही वादळाचा फटका बसला. वादळाचा जोर ओसरल्यानंतर ग्रामस्थांनी रस्त्यावर पडलेली झाडे तोडून बाजूला केली. त्यामुळे काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र, वीजवाहिन्यांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला.
लोरे परिसरात चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळताच तहसीलदार सूर्यकांत पाटील महसूल पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नुकसानीची प्राथमिक पाहणी केली. सायंकाळी अंधार झाल्यामुळे नुकसानीचे सविस्तर पंचनामे करता आले नाहीत. त्यामुळे महसूल यंत्रणेला पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, पंचनाम्यानंतर नुकसानीची नेमकी व्याप्ती स्पष्ट होणार आहे.दरम्यान पाच घरांचे नुकसान झालेची प्राथमिक माहिती आहे.
















