‘चला शाळेत जाऊया’ अभियानात आचरा केंद्रशाळा नं. १चा गौरव!

आचरा (प्रतिनिधी) : शालेय शिक्षण विभागाच्या ‘चला शाळेत जाऊया’ या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत आचरा केंद्रशाळा नं. १ आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली आहे. या कामगिरीबद्दल शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ७ ऑक्टोबर रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर यांच्यासह समिती सदस्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील DPDC हॉलमध्ये हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या अभियानांतर्गत जिल्ह्यात आदर्शवत काम करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समित्यांची निवड करून त्यांच्या कार्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये मालवण तालुक्यातील कै. बा. ना. विडये विद्यालय तसेच केंद्रशाळा आचरा नं. १ या शाळांच्या शाळा व्यवस्थापन समित्यांची निवड झाली आहे.

शिक्षण विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, आचरा केंद्रशाळा नं. १ ने शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. समितीच्या प्रयत्नांमुळे शाळेची पटसंख्या ८० वरून १०१ पर्यंत वाढली आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम आणि पालक सहभागाच्या माध्यमातून पालकांसह ग्रामस्थांना शाळेशी जोडण्यात समितीला यश आले आहे.

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’, ‘निपुण महाराष्ट्र’, ‘विज्ञान समृद्धी कार्यक्रम’, वारकरी दिंडी, माता पालक मेळावा तसेच गावातील दिंडी-जत्रांसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासाला चालना देण्यात आली आहे.

शाळेसाठी Wi-Fi सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, शालेय परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून दरमहा २,५०० रुपये मानधनावर सफाई कामगाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यात आला असून, विद्यार्थ्यांची इतर शाळांमध्ये शैक्षणिक भेटीसाठीही निवड झाली आहे. शैक्षणिक गुणवत्ता, पालकांचा सहभाग, स्वच्छता, डिजिटल सुविधा आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून आचरा केंद्रशाळा नं. १ ने सर्वांगीण विकासाचे आदर्श मॉडेल निर्माण केले आहे.

या उल्लेखनीय कार्याची दखल घेत आचरा केंद्रशाळा नं. १ची निवड करण्यात आली आहे. या गौरवाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर, सर्व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!