कणकवली (प्रतिनिधी) : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग, तोंडवलीच्या विद्यार्थ्यांनी आणि दिविजा वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी समाजसेवेचा आदर्श घालून देणारा उपक्रम राबविला. संस्थेचे सचिव संदेश शेट्ये यांच्या उपस्थितीत वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांचे पाद्यपूजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यात आला.
आषाढी पौर्णिमेनिमित्त साजऱ्या होणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी “गुरु” या संकल्पनेचा व्यापक अर्थ विद्यार्थ्यांसमोर मांडत, ज्येष्ठ नागरिकांनाच गुरुस्थानी मानून त्यांचे पाद्यपूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांचे पाय धुऊन त्यांना फुले व तुळशी अर्पण करत त्यांचा आशीर्वाद घेतला.
यावेळी दिविजा वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी सुमधुर भजन सादर करून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून टाकला. उपस्थित आजी-आजोबांनी विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना भरभरून आशीर्वाद दिले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वडीलधाऱ्यांप्रती आदर, कृतज्ञता आणि सेवाभावाची भावना अधिक दृढ झाली. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे, तर सामाजिक व सांस्कृतिक संस्कारही मिळतात, असे मत दिविजा वृद्धाश्रमाचे संचालक संदेश शेट्ये यांनी व्यक्त केले.
















