बांदा (प्रतिनिधी) : झपाट्याने बदलत असलेला आधुनिक कालखंड हा स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी असून या कालखंडात भेटलेल्या प्रत्येक गुरूंचा सन्मान करायला शिका, आपले व्यक्तिमत्व घडत असताना अनेक संस्काराचा आपल्यावर प्रभाव पडत असतो. हे संस्कार आत्मसात करून आपले व्यक्तिमत्व घडवायचे असते. ‘ गुरु ‘ ही संकल्पना मानवी जीवनाला आकार देणारी संकल्पना आहे.निसर्ग हा बिन भिंतीची शाळा आहे, निसर्गाकडून आपणास खूप काही आत्मसात करायला संधी मिळत असते. जीवनात सतत ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता माणसाला एका उंचीवर घेऊन जाते, यासाठी नम्रपणे ज्ञानाचा, गुरूंचा आपण आदर करायला शिका “असे प्रतिपादन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. डॉ. एम. एन.वालावलकर यांनी येथे केले.
येथील गोगटे –वाळके महाविद्यालय बांदाच्या सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा समारंभाला संबोधित करताना प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. वालावलकर हे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. रश्मी काजरेकर यांनी केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रजनन करण्यात आले. यावेळी गुरुप्रती आपल्या भावना व्यक्त. करताना अमोल देसाई ( प्रथम वर्ष कला) व सुहानी जाधव ( प्रथम वर्ष कला) यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. डॉ. वालावलकर पुढे म्हणाले की, ” गुरु विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, योग्य विचारांची शिकवण व जीवनाला सक्षम वळण देणारा असावा. तरच गुरु– शिष्य नाते अबाधित राहील. गुरुचा महिमा अगाध आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला आदराचे स्थान आहे. आपल्या आई-वडिलांचा सन्मान करत गुरुचा सन्मान करा.”
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर म्हणाले की, ” भारतीय ज्ञान प्रणालीत ” गुरु ” ही संकल्पना अध्यात्म, व ज्ञान या दोन गोष्टीशी जोडली गेली आहे. अध्यात्म क्षेत्रात गुरुला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे.भारतीय ज्ञानपरंपरा गुरुला वंदन करणारी आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरुकडून प्रेरणादायी संस्कार मिळतात. गुरुमुळे विवेक शक्ती जागृत होते, माणूस विचारशील, संस्कारशील होण्यात गुरूचा वाटा मोठा असतो. गुरुचे मार्गदर्शन हेच जीवनाचे खरे दिशादर्शक असते.त्यांच्या प्रेरणेनेच आपण यश, संस्कार आणि सदमार्गावर मार्गक्रमण करत असतो. गुरु– शिष्याचे नाते हे श्रद्धा, संस्कार आणि ज्ञानाचा पवित्र सेतू आहे ” कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे माजी संचालक गुरुवर्य शरदचंद्र महाबळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रमाकांत गावडे यांनी केले यांनी केले तर आभार ग्रंथपाल प्रा. डॉ. अनिल शिर्के यांनी व्यक्त केले यावेळी सर्व गुरूंचा सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांच्या हस्ते करण्यात आला.











