शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामिनावर स्थगिती कायम…!

ॲड. श्रीराम धोंडू चिंदरकर यांनी फिर्यादीं तर्फे मांडली बाजू

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यात जामिनावरील स्थगिती कायम राहीली आहे अशी माहिती मिळत असून, आरोपींकडून स्थगिती उठविण्याची मागणी उच्च न्यायालयाकडून नामंजूर करण्यात आल्याचे समजते आहे. आरोपींची ओळख परेड होत नाही तोपर्यंत स्थगिती उठवता येणार नाही अशी भूमिका फिर्यादीं तर्फे ॲड. श्रीराम धोंडू चिंदरकर यांनी मांडली.

ह्या प्रकरणाची सुनावणीची प्रक्रिया, ३१ जुलै २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयात कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे तथा न्यायमूर्ती गौतम ए. अंखड यांच्या खंडपीठासमोर करण्यात आली. सुनावणीदरम्यान फिर्यादी डॉ. वैभव साळुंखे यांच्या वतीने जोरदार विरोध करण्यात आला. फिर्यादीच्या वतीने ॲड. श्रीराम चिंदरकर, ॲड. विवेक निशाद, अभिनय रविंद्र अडसूळ यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. फिर्यादीतर्फे बाजू मांडताना फिर्यादीचे वकील यांनी सांगितले आरोपींची ओळख परेड होत नाही तोपर्यंत जामिनावरील स्थगिती उठवता येणार नाही. तसेच फिर्यादी मूळ गावी वाशिम येथे राहत असल्यामुळे त्यांना आरोपींच्या ओळख परेड साठी पोलीस संरक्षणा सहित मुंबई येथे आणावे व परत मूळ गावी नेऊन सोडावे अशी मागणी करण्यात आली.

फिर्यादीच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले की, संबंधित घटना घडत असताना फिर्यादीने केलेली व्हॉइस रेकॉर्डिंग्ज तसेच त्या रेकॉर्डिंग्जचे लिखित ट्रान्सक्रिप्शन न्यायालयात पुरावा म्हणून दाखल करण्यात आले आहे. या पुराव्यांमधून फिर्यादीच्या जीवितास गंभीर धोका असल्याचा मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात आला.

याशिवाय, प्रकरणातील ओळख परेड (Test Identification Parade) तसेच इतर अनेक महत्त्वपूर्ण तपासाच्या प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेल्या नसल्याचा मुद्दाही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. तपास यंत्रणेकडून अद्याप महत्त्वाचे तपासकार्य सुरू असल्याने आणि प्रकरणातील तपास पूर्ण होणे बाकी असल्याने आरोपीच्या जामिनावरील स्थगिती कायम ठेवणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद फिर्यादीच्या वतीने करण्यात आला.

दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने आरोपींच्या वतीने करण्यात आलेली जामिनावरील स्थगिती उठविण्याची मागणी नाकारत नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामिनावरील स्थगिती कायम ठेवली. तसेच फिर्यादी डॉक्टर साळुंखे यांना पोलीस संरक्षणासहित ओळख परेड साठी मुंबई येथे आणण्याचे व परत मूळ गावी नेऊन सोडण्याचे आदेश दिले.

दरम्यान, प्रकरणातील तपास अद्याप सुरू असून महत्त्वाच्या तपास प्रक्रिया पूर्ण होणे बाकी असल्याने न्यायालयाने आरोपीच्या जामिनावरील स्थगिती कायम ठेवत प्रकरणाची पुढील सुनावणी दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी निश्चित केली आहे.

रमेश म्हात्रे प्रकरणातील हा आदेश फिर्यादीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच प्रलंबित तपासाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानला जात असून, पुढील सुनावणीकडे राज्यभरातील कायदे वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!