आचरा (प्रतिनिधी) : मौजे बुधवळे (ता. मालवण) परिसरात रानगवा व वानरांमुळे होत असलेल्या पिकांच्या नुकसानीसह वन्यप्राण्यांचा लोकवस्ती परिसरात वाढलेला वावर याबाबत सामाजिक कार्यकर्ते समीर मुणगेकर यांनी दिलेल्या निवेदनाची वनविभागाने तात्काळ दखल घेतली. उपवन संरक्षक मिलिश शर्मा (IFS) व सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी चेतन पाटील, वनक्षेत्रपाल, कुडाळ यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांसह मौजे बुधवळे (मळेशेतवाडी) येथे प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानग्रस्त परिसराची पाहणी केली.
यानंतर बुधवळे येथील विठ्ठल मंदिरात बुधवळे पंचक्रोशीतील शेतकरी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांसमवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीबाबत शासनाकडून मिळणाऱ्या नुकसानभ रपाईसाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया व पुढील कार्यवाही याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी वन्यजीव संरक्षण तसेच वन्यप्राण्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी घ्यावयाच्या आवश्यक खबरदारी बाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली. वनक्षेत्रपाल चेतन पाटील यांनी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याबरोबरच अप्रिय घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येतील, असे आश्वासन दिले. वनविभागाने निवेदनाची तात्काळ दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी व मार्गदर्शन केल्याबद्दल शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तसेच समीर मुणगेकर यांनी वनविभागाचे आभार मानले.
यावेळी चेतन पाटील (वनक्षेत्रपाल, कुडाळ), मा. श्री. पानवलकर (सरपंच, बुधवळे), समीर मुणगेकर (सामाजिक कार्यकर्ते), श्री. परुळेकर (सामाजिक कार्यकर्ते), सदानंद परब (वनपाल, मालवण), अतुल खोत (वनरक्षक, धामापूर), लक्ष्मण आमले (वनरक्षक, कांदळगाव), आर.आर.टी कुडाळ व मालवणचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












