प्रसिद्धीसाठी आरोप करण्यापेक्षा सिंधुदुर्गात अन्न व पाणी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा

बंडू हर्णे यांनी वस्तुस्थिती समजून घेऊन व्यापारी व हॉटेल व्यावसायिकांच्या हितासाठी ठोस प्रयत्न करावेत – सुजित जाधव

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्न व पाणी तपासणीच्या विषयावर माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत वस्तुस्थिती स्पष्ट होणे गरजेचे आहे. सदर विषयावर प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा या तपासणी कार्यक्रमाशी थेट संबंध असल्याचा गैरसमज निर्माण होऊ शकतो. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्नपदार्थ तपासणी तसेच पाणी तपासणीसाठी आवश्यक अशा शासकीय प्रयोगशाळांची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे अशा तपासणीसाठी बाहेरील मान्यताप्राप्त प्रयोगशाळांची मदत घ्यावी लागते. ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे, सदर अन्न व पाणी तपासणी कार्यक्रमाचे आयोजन अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आलेले नसून व्यापारी महासंघ व हॉटेल चालक-मालक संघटना यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन, त्यासाठीची व्यवस्था अथवा शुल्क यांचा थेट संबंध अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी जोडणे योग्य नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज हजारो हॉटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते, व्यापारी तसेच विविध प्रकारचे अन्न व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत. या सर्व व्यावसायिकांच्या दृष्टीने जिल्ह्यातच अन्नपदार्थ तपासणी आणि पाणी तपासणीसाठी स्वतंत्र शासकीय प्रयोगशाळा असणे ही काळाची गरज आहे.

त्यामुळे माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केवळ बातम्यांच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून जिल्ह्यात शासकीय अन्न तपासणी प्रयोगशाळा आणि पाणी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत.
अशा प्रयोगशाळा सिंधुदुर्गात सुरू झाल्यास जिल्ह्यातील व्यापारी व हॉटेल व्यावसायिकांना तपासणीसाठी बाहेरील ठिकाणी किंवा प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागणार नाही. तपासणी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि कमी खर्चाची होण्यास मदत होईल.

व्यापाऱ्यांच्या हितासाठी प्रश्न उपस्थित करण्याचे स्वागतच आहे; मात्र त्याआधी सदर कार्यक्रमाचे आयोजन कोणी केले, तपासणीची व्यवस्था कोणी केली आणि त्यामध्ये अन्न व औषध प्रशासनाची नेमकी भूमिका काय आहे, याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. प्रसिद्धीसाठी वारंवार बातम्या देण्यापेक्षा जिल्ह्यातील हजारो व्यापारी, हॉटेल चालक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या कायमस्वरूपी प्रश्नावर प्रत्यक्ष शासनदरबारी पाठपुरावा करणे अधिक महत्त्वाचे आहे. बंडू हर्णे यांनी हा विषय राजकीय आरोप-प्रत्यारोपांपुरता मर्यादित न ठेवता जिल्ह्यात अन्न व पाणी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आहे.

“प्रश्न निर्माण करण्यापेक्षा प्रश्नाचे कायमस्वरूपी समाधान करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सिंधुदुर्गात प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करा, हीच व्यापारी व हॉटेल व्यावसायिकांच्या हिताची खरी भूमिका आहे,” असे सुजित जाधव यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!