सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील विद्यार्थी सहभागी होणार
कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत विभागीय केंद्र कोल्हापूर आणि कणकवली कॉलेज अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने २६ वा विभागीय सांस्कृतिक महोत्सव रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील विविध अभ्यास केंद्रांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जाणीव व आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने दरवर्षी विभागीय पातळीवर युवक महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी कोल्हापूर विभागाच्या या महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी कणकवली महाविद्यालय अभ्यास केंद्राला मिळाली आहे. या महोत्सवामध्ये नृत्य, अभिनय, संगीत, ललित कला, वाङ्मय, मूर्तिकला, फोटोग्राफी यांसह विविध २८ कला प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. विविध कला प्रकारांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार असून, विभागीय स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील टप्प्यात नाशिक येथे होणाऱ्या केंद्रीय महोत्सवात सहभागी होता येणार आहे. तसेच केंद्रीय स्तरावर यशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे राष्ट्रीय पातळीवरील ‘इंद्रधनुष्य’सारख्या आंतरविद्यापीठीय सांस्कृतिक युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळते.
कणकवली महाविद्यालय अभ्यास केंद्राने यापूर्वीही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विभागीय सांस्कृतिक महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले आहे. यंदा पुन्हा एकदा या महत्त्वपूर्ण सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्याची संधी अभ्यास केंद्राला मिळाल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि आयोजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील सर्व अभ्यास केंद्रांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या विभागीय सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होऊन आपल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून घ्यावे आणि या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कणकवली महाविद्यालय अभ्यास केंद्राचे केंद्रप्रमुख प्र. प्राचार्य युवराज महालिंगे, केंद्र संयोजक एम. जे. कांबळे आणि विभागीय सांस्कृतिक समन्वयक प्रा. हरिभाऊ भिसे यांनी केले आहे.












