‘Tree of Life’च्या ५० खोल्यांच्या आलिशान हॉटेलसाठी करार; २४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन
देवगडसह सिंधुदुर्गच्या पर्यटनाला नवी झेप; रोजगार, व्यवसाय आणि दरडोई उत्पन्नवाढीला चालना
पर्यटनाच्या शिखरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याला नेण्याचा आपला प्रयत्न; मंत्री नितेश राणे
दोन हाताला काम आणि दर्जेदार नोकऱ्यांची निर्मिती होणार
देवगड (प्रतिनिधी) : कोकणच्या निसर्गसौंदर्याला जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांची जोड देत सिंधुदुर्गला देश-विदेशातील पर्यटकांचे प्रमुख पर्यटन केंद्र बनविण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील प्रसिद्ध कुणकेश्वर गाव येथे ‘Tree of Life’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या आलिशान हॉटेलची उभारणी करण्यात येणार आहे. पन्नास खोल्याचे हे पंचतारांकित हॉटेल दोन वर्षात पूर्ण होणार आहे व यासंदर्भातील करार मंत्रालयात मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या उपस्थिती ट्री ऑफ लाईफ’ हॉटेलसाठी ‘स्टार्टर बिल हॉस्पिटलिटी प्रा. लि.’ आणि ‘राजस्केप हॉटेल्स प्रा. लि.’असा करार झाला.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, ताज ग्रुपचे तन्वीर जाहीदी, दत्तात्रय हिरे आणि रोहन रानडे, डॉक्टर निलेश बानवलीकर, ॲड. श्रीपात महाजन उपस्थित होते.
कुणकेश्वर येथे साकारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात ५० खोल्यांचे आलिशान हॉटेल उभारण्यात येणार असून, अवघ्या २४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कुणकेश्वरला आता जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांची नवी जोड मिळणार आहे. या प्रकल्पामुळे देवगडसह संपूर्ण सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
शिरोडा-वेळागरनंतर आता कुणकेश्वर येथे ताज हॉटेल्स ब्रँडची येत असल्याने असल्याने जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आतिथ्य क्षेत्राचा विस्तार होणार आहे. पर्यटन वाढी सोबतच हॉटेल, वाहतूक, स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकला, सेवा व्यवसाय आणि अन्य पूरक उद्योगांना नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
कुणकेश्वरच्या पर्यटन नकाशावर या प्रकल्पामुळे आणखी एक महत्त्वाचा अध्याय जोडला जाणार आहे. समुद्रकिनारा, निसर्गसौंदर्य आणि धार्मिक पर्यटन अशी वैशिष्ट्यपूर्ण ओळख असलेल्या देवगड तालुक्यात जागतिक दर्जाचे हॉटेल उभारले जात असल्याने देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार निवास व आतिथ्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या तसेच व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण होण्यास हातभार लागणार आहे. पर्यटनाशी संबंधित विविध क्षेत्रांना चालना मिळाल्यास त्याचा व्यापक आर्थिक परिणाम जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेवर होऊन दरडोई उत्पन्नवाढीलाही हातभार लागण्याची अपेक्षा आहे.
सिंधुदुर्गला पर्यटनाच्या माध्यमातून विकासाची नवी दिशा देण्याच्या प्रयत्नांमध्ये कुणकेश्वर येथील हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.
कोकणातील निसर्गसंपदा, समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे आणि स्थानिक संस्कृती यांना जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांची जोड मिळाल्यास सिंधुदुर्गची पर्यटन ओळख अधिक व्यापक होण्यास मदत होणार आहे. यामुळे दोन तरुण तरुणींना दोन हाताला काम आणि दर्जेदार नोकऱ्या देण्याचा आपला प्रयत्न आहे. या निमित्ताने जिल्हा पर्यटनाच्या उंच शिखरावर घेऊन जाण्याचा आपला प्रयत्न असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.










