महिला वनरक्षकाच्या आत्महत्येस सहकारी वनरक्षक कारणीभूत असल्याची वडिलांची फिर्याद

वनरक्षक सनिकेत पाटील विरोधात गुन्हा दाखल

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील वनविभागात कार्यरत असलेल्या महिला

वनरक्षक युवतीच्या आत्महत्येस जबाबदार ठरल्या प्रकरणी तिचा सहकारी वनरक्षक सनिकेत सतीश पाटील (वय २६, रा. कापूरखेड, ता. वाळवा, जि. सांगली) याच्याविरुद्ध आज सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

माडखोल-धवडकी बेबीवाडी येथे १६ ऑगस्टला आश्लेषा मांगले या महिला वनरक्षक तरुणीने भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन जीवन संपवले होते. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. सावंतवाडी वनविभागातच तिच्यासोबत वनरक्षक म्हणून काम करणाऱ्या सनिकेत पाटील याच्याशी तिचे प्रेमसंबंध होते. त्याने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शरीरसंबंध ठेवले, मात्र नंतर लग्नास नकार दिला. याच मानसिक तणावातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. तसेच घटनेच्या वेळी संशयिताने कोणालाही काही न सांगता तिला एकट्यानेच गळफासावरून खाली उतरवून रुग्णालयात नेल्याचेही निष्पन्न झाले होते.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर आज मयत तरुणीचे वडील सागर भीमराव मांगले (वय ५१, रा. लाकूडवाडी, ता. आजरा, जि. कोल्हापूर) यांनी सावंतवाडी पोलिसांत अधिकृत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित वनरक्षक सनिकेत पाटील याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०८ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक मुळीक तपास करत असून संशयिताला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

error: Content is protected !!