जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता

ॲड. राजेंद्र रावराणे आणि ॲड. विलास परब यांचा यशस्वी युक्तिवाद

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरना मारहाण करून रुग्णालयाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपींची पुराव्याअभावी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
आरोपींच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे आणि ॲड. विलास परब यांनी यशस्वी युक्तिवाद केला.
जुलै २०२० मध्ये कासार्डे येथील स्मिता शिवाजी भोसले यांना श्वसनाच्या त्रासामुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्या नातेवाईकांचा डॉक्टरांशी वाद झाला. यावेळी डॉक्टरांना मारहाण, शिवीगाळ तसेच रुग्णालयाच्या आयसीयू च्या दरवाज्याची काच फोडून नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला होता.
या प्रकरणी डॉ. सौरभ लिहीतकर यांच्या तक्रारीवरून दत्तराज शिवाजी भोसले, राजेश शिवाजी भोसले, राकेश शिवाजी भोसले तसेच विश्वनाथ भोसले या आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६, ३४ तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यक्ती व वैद्यकीय सेवा संस्था संरक्षण अधिनियम २०१० मधील कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचदरम्यान स्मिता भोसले यांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूस रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत आरोपींच्या वतीनेही पोलिसांत तक्रार करण्यात आली होती.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान डॉक्टर, पंच आणि तपासी अधिकाऱ्यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. मात्र, घटनास्थळी सीसीटीव्ही असतानाही त्याचे फुटेज तपासात समाविष्ट न करणे, तक्रार व टिपणे उशिरा नोंदविणे, तसेच आरोपींनी रुग्णालयाविरोधात तक्रार केल्याने रुग्णालयाची बदनामी होऊ नये म्हणून डॉक्टरांनी फिर्याद दिल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद यामुळे खटल्यातील पुराव्यांवर प्रश्न उपस्थित झाले.
अखेर पुराव्याअभावी सत्र न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

error: Content is protected !!