आरोपी सुबत्ता माळी चा अटकपूर्व जामीन फेटाळला
सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : सेंट्रल गव्हर्नमेंट ची नोकरी लावण्याच्या बहाण्याने पाच जणांकडून प्रत्येकी 24 लाख असे एकूण 1 कोटी 20 लाख उकळण्याच्या गुन्ह्यातील आरोपी सुबत्ता गिरीश माळी ( रा.पुणे ) हिचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायाधीश – 1 श्री. त्रिपाठी यांनी फेटाळला. याकामी सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे आरोपी सुबत्ता माळी हिच्यावर अटकेची टांगती तलवार असून अटक टाळण्यासाठी हायकोर्टात दाद मागावी लागणार आहे. फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तसेच मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे ऑफ इंडिया येथे नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून पाच जणांकडून प्रत्येकी 24 लाख घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा कणकवली पोलीस ठाण्यात दाखल आहे. सुनील दामोदर धुरे ( रा.कलमठ गावडेवाडी ) यांच्या फिर्यादीनुसार सुबत्ता माळी, विनिता विवेक मुंज ( रा. कणकवली ) आणि मनोजकुमार जैन ( रा.वाशीम ) या त्रिकुटावर गुन्हा रजिस्टर नंबर 187 /2026 चा बिएनएस नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपी सुबत्ता माळी हिने अटकपूर्व जामीन मंजूर होण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीवेळी सरकारी वकील रुपेश देसाई यांनी जोरदार हरकत घेत पुढील मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. 1 कोटी 20 लाख एवढ्या मोठ्या रकमेची फसवणूक हा संगनमताने गुन्हा केला असून केंद्र शासनाच्या बनावट दस्तऐवज वापरून ती खरी असल्याचे भासवले आहे याबाबत तपास करायचा आहे, आरोपी सुबत्ता माळी ही पूर्वश्रमीची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून तिने स्वतःच्या बँक खात्यावर आणि तिची आई सुनीता सदानंद वारंग हिच्या बँक खात्यावर फिर्यादी आणि साक्षीदार यांच्याकडून पैसे स्वीकारले असून ते पैसे कोणत्या उद्देशाने घेतले व त्याचा व्यवहार पुढे कसा झाला याचा तपास करायचा आहे, आरोपी सुबत्ता माळी हिने या रक्कमेतुन जंगम मालमत्ता घेतली असल्यास त्याचा तपास करणे, आरोपी सुबत्ता हिने स्वतः दिल्लीत उपस्थित राहून काही साक्षीदार मुलांकडून आवेदन फॉर्म भरून घेतले आहेत. तक्रारदार व साक्षीदार यांना दिलेली बनावट सहीची कागदपत्रे आणि बोगस अपॉईंटमेंट लेटर दस्तऐवज कोठे आणि कोणी तयार केले याचा तपास करायचा आहे यासह अन्य मुद्दे उपस्थित करत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी आरोपी सुबत्ता माळी हीचा अटकपूर्व जामीन नामंजूर करण्यासाठी युक्तिवाद केला. सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश श्री. त्रिपाठी यांनी आरोपी सुबत्ता माळी हीचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळल्यावर आता सुबत्ता वर अटकेची टांगती तलवार असून अटक टाळण्यासाठी हायकोर्टात दाद मागावी लागणार आहे.












