वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे येथील रहिवासी आणि सध्या सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय, सावळज येथे ज्युनिअर विभागात इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले रमाकांत पांचाळ यांनी इंग्रजी विषयातून राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) सलग दुसऱ्यांदा उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला आहे. NET ही देशपातळीवर घेतली जाणारी अत्यंत महत्त्वाची आणि स्पर्धात्मक परीक्षा असून, देशभरातील उच्च शिक्षण क्षेत्रात अध्यापन व संशोधनाच्या दृष्टीने या परीक्षेला विशेष महत्त्व आहे. मोठ्या संख्येने उमेदवार या परीक्षेला सामोरे जात असताना सातत्यपूर्ण अभ्यास, विषयाचे सखोल ज्ञान, योग्य नियोजन आणि प्रचंड मेहनतीशिवाय या परीक्षेत यश मिळविणे आव्हानात्मक मानले जाते. अशा या देशपातळीवरील कठीण परीक्षेत सलग दुसऱ्यांदा यश संपादन करून पांचाळ यांनी आपल्या अभ्यासातील सातत्य आणि जिद्द सिद्ध केली आहे.
यापूर्वीही त्यांनी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (MH-SET) 2023 मध्ये इंग्रजी विषयातून यश संपादन केले आहे. त्यामुळे NET आणि SET या दोन्ही महत्त्वाच्या पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याची त्यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली आहे.
रमाकांत पांचाळ यांचा आजवरचा जीवनप्रवास संघर्षमय आणि खडतर राहिला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाची आणि ज्ञानाची कास न सोडता त्यांनी आपल्या ध्येयाच्या दिशेने सातत्याने वाटचाल केली. शिक्षक म्हणून कार्यरत असतानाही अध्यापनाची जबाबदारी सांभाळून त्यांनी NET परीक्षेच्या तयारीसाठी केलेली मेहनत आणि अभ्यासातील सातत्य कौतुकास्पद आहे. “परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, सातत्य आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर ध्येय गाठता येते,” याचे प्रेरणादायी उदाहरण पांचाळ यांच्या यशातून पाहायला मिळते.
त्यांच्या या यशाबद्दल महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सावळज येथील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, मित्रपरिवार तसेच उंबर्डे व वैभववाडी परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधनाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.











