कणकवली नगरपंचायतच्या स्वच्छता गृह बांधकामातील भ्रष्टाचाराची महाविकास आघाडीने पुन्हा केली पोलखोल

बांधकामासाठी आवश्यक CRS स्टील ऐवजी साधे स्टील वापरले

कॉंक्रीट देखील M२० कमी दर्जाचे;शासनाच्या निधीची झाली उधळपट्टी

जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार

चौकशी करून कारवाई न केल्यास ठिय्या आंदोलन छेडण्याचा महाविकास आघाडीचा इशारा

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली नगरपंचायत भाजी मार्केट येथे स्वच्छता गृह बांधकामातील भ्रष्टाचाराची महाविकास आघाडीने पुन्हा एकदा पोलखोल केली आहे.अंदाजपत्रकात नमुद असलेले आणि प्रत्यक्षात वापरलेल्या मटेरियल मध्ये मोठी तफावत असल्याची तक्रार माजी नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. बांधकामासाठी लागणारे स्टील CRS चे वापरणे आवश्यक असताना फुटिंग पासून स्लॅब पर्यंत साधेच स्टील वापरण्यात आले. कॉंक्रीट देखील M२० कमी दर्जाचे वापरण्यात आल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. स्वच्छता गृह बांधकामात शासनाच्या निधीची उधळपट्टी केली जात असून कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने कणकवली नगरपंचायतीने स्वच्छता गृहासाठी मंजूर झालेल्या शासकीय रक्कमेत मोठा भ्रष्टाचार केला आहे.त्यामुळे स्वच्छता गृहाचे सुरू असलेले बांधकाम थांबवून या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर सखोल चौकशी करून कारवाई करावी अन्यथा भ्रष्ट कारभाराच्या विरोधात ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा महाविकास आघाडीने दिला आहे. दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे कि, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत भाजी मार्केट येथे स्वच्छता गृह बांधकाम करणे या कामासाठी ८५,९८,८८७ रु. एवढ्या रक्कमेस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी तांत्रिक मंजुरी दिली आहे.

स्वच्छता गृह हे जवळपास ८०० स्वे.फु. कार्पेट एरियाचे आहे. तांत्रिक मंजुरीच्या रक्कमेच्या अनुषंगाने प्रति स्वे.फु. १०,५०० रुपये दर या बांधकामाला निच्छित करण्यात आला आहे. एवढा भरमसाट दर कुठल्याच बांधकामाला दिला जात नाही. त्याचबरोबर बांधकामासाठी लागणाऱ्या मटेरीअलच्या वाहतुकीचे लीड हे जाणून बुजून जास्त किलोमीटर दाखविण्यात आले आहे. बांधकामासाठी लागणारे स्टील देखील CRS चे वापरणे आवश्यक असताना फुटिंग पासून स्लॅब पर्यंत साधेच स्टील वापरण्यात आले आहे.या भ्रष्टाचारात नगरपंचायत इजिनिअर देखील सामील आहे. त्यांच्या डोळ्यादेखत साधे स्टील वापरण्यात आले आहे. स्वच्छता गृह बांधकामासाठी ८५,९८,८८७ एवढी रक्कम खर्च केली जाणार असल्याने कॉंक्रीट देखील M ३० किंवा M४० असणे आवश्यक होते. मात्र त्याठिकाणी M२० कॉंक्रीट वापरण्यात येत आहे. कणकवली शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे रेस्ट हाउस बांधकाम देखील सुरु आहे. त्या बांधकामासाठी M ३० कॉंक्रीट वापरले जात आहे. रेस्ट हाउस व स्वच्छता गृह बांधकाम हि दोन्ही कामे कणकवली शहरातच सुरु आहेत. मात्र दोन्ही कामांच्या अंदाजपत्रकात मोठी तफावत आढळून येत आहे. स्वच्छता गृहाचे जे काम सुरु आहे ते अंदाज पत्रकानुसार करण्यात आलेले नाही. त्यामुळे स्वच्छता गृह बांधकामात शासनाच्या निधीची उधळपट्टी केली जात असून कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने कणकवली नगरपंचायतीने स्वच्छता गृहासाठी मंजूर झालेल्या शासकीय रक्कमेत मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे स्वच्छता गृहाचे बांधकाम थांबवून या कामाची जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर सखोल चौकशी करून कारवाई करावी अन्यथा भ्रष्ट कारभाराच्या विरोधात ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाविकास आघाडीने दिला आहे. यावेळी महेश तेली (तालुका सरचिटणीस), प्रवीण वरूनकर ,नागेश मोरे (जिल्हा उपाध्यक्ष) ,निलेश मलांडकर, कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, प्रमोद मसुरकर, जयेश धुमाळे ,सचिन सावंत आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!