वानरांपासून शाळा इमारतीचे संरक्षण; अध्यक्ष हनुमंत प्रभू यांचा स्तुत्य उपक्रम
आचरा (प्रतिनिधी) : ज्ञानदीप संस्था वायंगणीच्या आवारात स्वच्छता तसेच शाळा इमारतीच्या संरक्षणाच्या दृष्टीने विविध कामे करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी पुढाकार घेत ही सर्व कामे स्वखर्चाने करून घेतली.
संस्थेच्या आवारातील जुनाट आंब्याच्या झाडाच्या मरकट फांद्या व बांडगुळे काढण्यात आली. तसेच नारळाची झाडे व आंबा कलमांच्या भोवतालची झाडी साफ करून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.
दरम्यान, शाळेच्या इमारतीवर वानर उड्या मारत असल्याने इमारतीवरील कौले फुटण्याचे प्रकार घडत होते. यावर उपाय म्हणून सागाच्या झाडाच्या काही किरकोळ फांद्या छाटून इमारतीचे संरक्षण करण्यात आले. तसेच फुटलेली कौले लावून घेण्यात आली.
ही कामे करताना शालेय समितीचे अध्यक्ष बाबू हडकर व मुख्याध्यापक श्री.टकले उपस्थित होते.अध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी स्वखर्चातून राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक करून त्यांचे आभार व्यक्त केले. संस्थेच्या परिसराची स्वच्छता आणि शाळेच्या इमारतीचे संरक्षण यासाठी घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.












