देशसेवक जवानांना पब्लिक रिलेशन फाउंडेशनतर्फे राखी पाठवून रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम

सावंतवाडी (प्रतिनिधी) : देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या आणि आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने पब्लिक रिलेशन फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त विशेष उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमांतर्गत फाउंडेशनच्या बहिणींनी देशसेवा करणाऱ्या जवानांसाठी प्रेम, आपुलकी आणि आदराचे प्रतीक असलेल्या राख्या तयार करून त्या भारतीय टपाल सेवेमार्फत जवानांना पाठविण्यात आल्या. सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या या जवानांना आपल्या बहिणीची राखी मिळावी आणि त्यांना आपल्या देशातील नागरिकांचे प्रेम व आशीर्वाद जाणवावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवसही ठरावा, या भावनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. आपल्या कुटुंबापासून दूर राहून, सण-उत्सवाची पर्वा न करता देशाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या जवानांच्या त्यागाला सलाम करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.यावेळी पब्लिक रिलेशन फाउंडेशनच्या संस्थापक फिजा मकानदार, शिवानी मेस्त्री, श्रुती सावंत, भाविका कदम, प्रेरणा पोकळे यांच्यासह फाउंडेशनच्या सदस्यांची उपस्थिती होती.“सीमेवर उभा असलेला प्रत्येक जवान हा देशाचा भाऊ आहे आणि त्याच्या मनगटावर बांधलेली प्रत्येक राखी ही देशातील बहिणीच्या प्रेमाची आणि कृतज्ञतेची खूण आहे,” या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.जवानांच्या शौर्याला, त्यागाला आणि देशसेवेला सलाम करत ‘राखी देशासाठी, राखी देशाच्या जवानांसाठी’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

error: Content is protected !!