सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला की तो पुन्हा मिळण्याची शक्यता कमीच, असा अनेकांचा समज; मात्र सिंधुदुर्ग पोलिसांनी तो खोटा ठरविला आहे. ‘सीईआयआर’ (CEIR) पोर्टलच्या मदतीने केवळ दोन महिन्यांत ११ लाख ५६ हजार रुपये किमतीचे तब्बल ६८ मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह जम्मू-काश्मीर ते पश्चिम बंगाल आणि कर्नाटकपर्यंत पोहोचलेले हे मोबाईल शोधून ते संबंधित मालकांच्या हाती परत करण्यात आले.
जिल्ह्यात चोरीस गेलेल्या किंवा गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलिस ठाण्यासह जिल्ह्यातील १३ पोलिस ठाण्यांमध्ये स्वतंत्र ‘सीईआयआर पथके’ स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांना हरविलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहितीचा आधार घेत सातत्याने पाठपुरावा केला. अवघ्या दोन महिन्यांत ६८ मोबाईलचा माग काढण्यात यश आले.
शोधण्यात आलेले मोबाईल महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांबरोबरच जम्मू-काश्मीर, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांपर्यंत पोहोचले होते. संबंधित ठिकाणांशी समन्वय साधत पोलिसांनी हे मोबाईल परत मिळविले. आज बुधवारी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात मोबाईलच्या मूळ मालकाना बोलावून त्यांना शोधून काढलेले मोबाईल पुन्हा देण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोनी साटम यांच्या उपस्थितीत संबंधित नागरिकांना हे मोबाईल परत करण्यात आले. हरविलेला मोबाईल पुन्हा हातात मिळाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
दोन वर्षांतही उल्लेखनीय कामगिरी
हरविलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत करण्यामध्ये सिंधुदुर्ग पोलिसांनी यापूर्वीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०२४ मध्ये २७६, तर २०२५ मध्ये २८० मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले. २०२६ मध्ये यापूर्वी १०८ गहाळ मोबाईल शोधून संबंधितांना देण्यात आले आहेत. त्यात आता आणखी ६८ मोबाईलची भर पडली आहे.











