कुडाळ महिला व बाल रुग्णालयात जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन परिस्थितीतील तयारी आणि आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नव्याने स्थलांतरित झालेल्या जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्राला(DEIC) भेट देत कामकाजाचा आढावा घेतला.

अमरावती येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्री उपलब्ध राहावी तसेच सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन मार्ग, विद्युत व्यवस्था, ऑक्सिजन सुविधा तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचीही तपासणी करण्यात आली. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने व तत्परतेने कार्यवाही करण्याच्या दृष्टीने तयारी ठेवावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भावना तेलंग यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच रुग्णालयातील संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!