मंत्री नितेश राणे रत्नागिरी-सिंधुदुर्गात जाण्यासाठी सोडणार दोन मोदी एक्सप्रेस
9 आणि 11 सप्टेंबर रोजी दादर वरून प्लॅटफॉर्म नंबर 14 वरून सुटणार मोदी एक्सप्रेस
चाकरमानी गणेशभक्तांसाठी नितेश राणेंकडून अविरत 14 वर्षे मोफत ट्रेन सेवा
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी यंदा ‘मोदी एक्सप्रेस’ चा डबल धमाका जाहीर केला असून यावर्षी दोन मोदी एक्सप्रेस गणेशभक्त चाकरमान्यांसाठी सोडण्याचे जाहीर केले आहे. 9 सप्टेंबर आणि 11 सप्टेंबर रोजी दादर रेल्वे स्टेशनहून प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून मोदी एक्सप्रेस ट्रेन मुंबईकर चाकरमानी गणेशभक्तांना घेऊन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणार आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतून गावाकडे जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी आणि चाकरमान्यांसाठी मंत्री राणेंकडून ही मोठी खूशखबर आहे. गेल्या १४ वर्षांची परंपरा कायम ठेवत यावर्षीही भाजप नेते तथा मंत्री नामदार नीतेश राणे यांच्या पुढाकाराने ‘मोदी एक्सप्रेस’ पुन्हा एकदा कोकणात जाण्यासाठी सज्ज झाली आहे. आमदार नीतेश राणे यांनी विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे ही माहिती दिली.
प्रवासाचे नियोजन आणि वेळापत्रक:
दिनांक: ९ आणि ११ सप्टेंबर
प्रस्थान: दादर रेल्वे स्टेशन (प्लॅटफॉर्म क्रमांक १४)
वेळ: सकाळी १०:३० वाजता
प्रमुख थांबे: मुंबईहून निघाल्यानंतर ही ट्रेन रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली आणि शेवटचा थांबा सावंतवाडी येथे असेल.
प्रवाशांसाठी मोफत सुविधा:
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ‘मोदी एक्सप्रेस’ने प्रवास करणाऱ्या सर्व चाकरमान्यांसाठी मोफत खाण्या-पिण्याची आणि पाण्याची उत्तम सोय करण्यात येणार आहे.
तिकीट बुकिंग कसे कराल?
२ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर दरम्यान तिकीट बुकिंग सुरू राहील. बुकिंगसाठी कणकवली, देवगड आणि वैभववाडी येथील प्रवाशांनी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक मंडल अध्यक्षांशी संपर्क साधावा.
रत्नागिरी परिसरातील प्रवाशांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्याशी तिकीट बुकिंगसाठी संपर्क साधावा.
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुकर, आनंदी आणि विनाअडथळा व्हावा यासाठी ही सेवा पुरवण्यात येत असून, जास्तीत जास्त चाकरमान्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री नीतेश राणे यांनी केले आहे.












