वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी-वेंगसर-बौद्धवाडी-आजीवली मार्गे पाचल या मार्गावर तातडीने एसटी बससेवा सुरू करावी, अशी मागणी वेंगसरचे माजी सरपंच सुभाष कांबळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कणकवली एसटी आगाराच्या उपविभागीय नियंत्रकांकडे निवेदन सादर केले आहे. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर एसटी बससेवा उपलब्ध नसल्याने परिसरातील नागरिक तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. सार्वजनिक वाहतुकीअभावी विद्यार्थ्यांसह नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून, त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या मार्गावर एसटी बससेवा सुरू झाल्यास वेंगसर, बौद्धवाडी, गुरववाडी, घाडीवाडी, आजीवली परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या मागणीची तातडीने दखल घेऊन बससेवा सुरू करावी, अशी मागणी सुभाष कांबळे यांनी केली आहे.
वेंगसर-बौद्धवाडी-आजीवली मार्गावर एसटी बससेवा सुरू करा.












