विजयदुर्ग एसटी आगाराला मिळणार तीन नव्या गाड्या; मुंबईसह चिपळूण, सावंतवाडी मार्गही सुरू होणार

विजयदुर्ग (प्रतिनिधी) : विजयदुर्ग एसटी आगारातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पंचायत समिती सदस्यांसह लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या शिष्टमंडळाने कणकवली येथील विभागीय वाहतूक अधिकारी (डी.टी.ओ.) विक्रम देशमुख यांची भेट घेतली. यावेळी आगारातील बससेवा, नव्या गाड्यांची उपलब्धता तसेच बंद असलेले विविध मार्ग पूर्ववत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

पंचायत समिती सदस्य रविंद्र तिलोटकर, संजना आळवे, विजयदुर्गचे सरपंच रियाज काझी, आत्मा कृषी अध्यक्ष प्रसाद देवधर व विकास करंदीकर यांनी ही भेट घेतली. विजयदुर्ग आगाराच्या विविध समस्यांबाबत अधिकाऱ्यांसमोर वस्तुस्थिती मांडून प्रवाशांची गैरसोय दूर करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी १ सप्टेंबर २०२६ पासून विजयदुर्ग आगाराला तीन नवीन एसटी बस आणि तीन मिनीबस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन डी.टी.ओ. विक्रम देशमुख यांनी दिले. तसेच १ सप्टेंबरपासून विजयदुर्ग–चिपळूण आणि विजयदुर्ग–सावंतवाडी या मार्गांवरील सेवा सुरू करण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, १८ सप्टेंबरपासून विजयदुर्ग–विरार, विजयदुर्ग–डोंबिवली आणि विजयदुर्ग–बोरिवली या मार्गांवरील बससेवा सुरू करण्याचे आश्वासनही देण्यात आले. त्यामुळे विजयदुर्ग परिसरातील नागरिकांना मुंबईसह अन्य शहरांशी थेट एसटी प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

विजयदुर्ग आगारातील बसची कमतरता, विविध मार्गांवरील सेवा, प्रवाशांची गैरसोय आदी प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत टप्प्याटप्प्याने समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

error: Content is protected !!