देवघर धरणातून ६ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

२८ ऑगस्टपासून होणार पाण्याचा विसर्ग

कुडाळ (प्रतिनिधी) : देवघर धरणातील पाणीसाठा निर्धारित पातळीच्या जवळ पोहोचल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धरणाची महत्तम पाणीपातळी २८७.५० मीटर असून सध्या धरणातील पाणीपातळी २८५.७० मीटरपर्यंत पोहोचली आहे. मंजूर आरओएसनुसार पाणीपातळी २८५.६५ मीटरपर्यंत मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. तसेच आगामी काळात पावसाची शक्यता लक्षात घेता धरणातील पाणीसाठ्याचे नियमन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून वीज निर्मिती करून सुमारे ६.० क्यूमेक्स विसर्गाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर धरण क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी नदीपात्रात मिसळणार असल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या ग्रामस्थांनी तसेच शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, नदीपात्रात उतरू नये तसेच नदीकाठच्या परिसरात अनावश्यक वावर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अचानक पाणीपातळी वाढण्याची शक्यता असल्याने जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन मध्य प्रकल्प विभागीय पथक, आंबडपाल-कुडाळ कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, संबंधित तहसीलदार, ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक तसेच पोलीस यंत्रणेला याबाबत माहिती देण्यात आली असून नदीकाठच्या नागरिकांना सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!