वीज समस्यांवरून चिंदर ग्रामस्थ आक्रमक; महावितरणचे अधिकारी थेट ग्रामपंचायतीत

वीजवाहिन्यांवरील झाडी, बंद स्ट्रीटलाईट, गंजलेले पोल व वारंवार खंडित वीजपुरवठ्याची केली पाहणी; तात्काळ कार्यवाहीचे कार्यकारी अभियंता धनंजय शेंडे यांचे आश्वासन

आचरा (प्रतिनिधी) : वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, वीजवाहिन्यांवर वाढलेल्या झाडा-झुडपांमुळे बंद पडलेले स्ट्रीटलाईट, गंजलेले विद्युत पोल तसेच इतर विविध समस्यांमुळे त्रस्त झालेल्या चिंदर ग्रामस्थांनी अखेर महावितरणविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. “गावातील विद्युत समस्या जोपर्यंत मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत वीजबिल भरणार नाही,” असा ठराव २५ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या आचरा कार्यालयावर शिष्टमंडळ धडक देणार असल्याची माहिती मिळताच कार्यकारी अभियंता धनंजय शेडे व सहाय्यक अभियंता(आचरा) अमित पाटील यांनी चिंदर ग्रामपंचायतीत येत ग्रामस्थांशी थेट चर्चा केली.

यावेळी शिष्टमंडळातील संतोष गांवकर, दीपक सुर्वे, महेंद्र मांजरेकर, केदार परुळेकर व गोपाळ लब्दे यांनी कार्यकारी अभियंता धनंजय शेडे यांच्यासमोर गावातील वीज समस्यांचा पाढाच वाचला. “गावातील वीजबिलांची शंभर टक्के वसुली होत असताना चिंदरमधील विद्युत समस्या का सोडविल्या जात नाहीत? ग्रामस्थ महावितरणला सर्वतोपरी सहकार्य करत असताना अधिकारी व कर्मचारी प्रश्नांकडे दुर्लक्ष का करतात?” अशा सवालांचा भडिमार यावेळी करण्यात आला.

ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेत कार्यकारी अभियंता धनंजय शेडे यांनी चिंदर गावातील वीजवाहिन्यांवरील वाढलेली झाडी साफ करणे, एसटी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिनीच्या समस्या, गंजलेले विद्युत पोल, स्पेसर बसविणे तसेच बंद असलेल्या स्ट्रीटलाईटची प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित समस्यांवर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी विविध प्रश्नांवर महावितरण अधिकारी व ग्रामस्थांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. “गावातील विद्युत समस्या सोडविण्यासाठी आपले सर्वतोपरी सहकार्य राहील,” असा शब्द कार्यकारी अभियंता शेडे यांनी ग्रामस्थांना दिला.

दरम्यान, ग्रामसभेतील ठरावाचा संदर्भ देत शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता शेडे यांच्याकडे २ ऑक्टोबरपर्यंत कोणत्याही वीज ग्राहकावर वीजबिल वसुलीसाठी जबरदस्तीची कारवाई करू नये, अशी विनंती केली.

यावेळी प्रशासक उपसरपंच महेंद्र मांजरेकर, पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य केदार परुळेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष गांवकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, गोपाळ लब्दे, विवेक परब, सागर अपराज, पोलीस पाटील मंगेश नाटेकर, वायरमन संतोष अपराज, म्हापसेकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!