महाविद्यालय जिल्हा रुग्णालयाच्या उपहारगृहामध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने केलेल्या तपासणीत अस्वच्छ

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालयाच्या उपहारगृहामध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने केलेल्या तपासणीत अस्वच्छता तसेच अनेक त्रुटी आढळल्याने परवाना निलंबित करण्यात आला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयाचा उपहारगृहामधिल पदार्थांमध्ये मेलेले झुरळ सापडल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती. याबाबत एका व्यक्तीने जिल्ह्याच्या अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने आज अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड यांच्यासह त्यांच्या पथकाने उपहार गृहाची तपासणी केली असता येथील अस्वच्छतेसह अनेक त्रुटी आढळल्या आहेत. धान्य तसेच अन्नपदार्थ साठवणूक तसेच पीठ साठवणूक योग्यरित्या केलेली नाही. तेथील स्वयंपाकीने योग्य गणवेश परिधान केलेला नाही. साखरेमध्ये मुंग्या तसेच किचनमध्ये अस्वच्छता आढळून आली. तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय तपासणी केलेली नाही असे तपासणीत आढळून आले आहे. या उपहारगृहा मध्ये रुग्णांचे नातेवाईक उपाहार घेतात. तसेच काही नातेवाईक याच उपहारगृहातून आपल्या रुग्णाला खाद्यपदार्थ घेऊन जातात. त्यामुळे रुग्णांच्या तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबी तपासणीत समोर आल्या आहेत. याबाबत जिल्हा अन्न व औषध प्रशासनाने गंभीर दखल घेत संबंधित उपहारगृह तात्काळ बंद ठेऊन पुढील आदेश होईपर्यंत परवाना निलंबित केला आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड यांनी दिली.

error: Content is protected !!