क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; सुरेंद्र सकपाळ यांना ‘राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार’ जाहीर…!

आचरा (प्रतिनिधी) : सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आविष्कार फाउंडेशन, इंडिया (कोल्हापूर) यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार–२०२६’ साठी सिंधुदुर्ग जिल्हा लगोरी असोसिएशनचे अध्यक्ष तथा क्रीडा मार्गदर्शक सुरेंद्र सिताराम सकपाळ यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील प्रदीर्घ व उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

सुरेंद्र सकपाळ हे जनता विद्यामंदिर, त्रिंबकच्या शाळा कमिटीचे अध्यक्ष, कै. गाडगीळ मोफत वाचनालय, त्रिंबकचे अध्यक्ष, कोमसाप आणि कथामाला मालवणचे आजिव सदस्य तसेच सेवानिवृत्त सीबीआय अधिकारी आहेत. यासोबतच ते शूटिंग बॉलचे क्रीडा मार्गदर्शक आणि राष्ट्रीय पंच म्हणूनही कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूंना मार्गदर्शन करून त्यांना क्रीडा क्षेत्रात पुढे आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

आविष्कार फाउंडेशन गेल्या १९ वर्षांपासून विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवत असून, दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक, उद्योजक, क्रीडा प्रशिक्षक व मार्गदर्शकांचा सन्मान केला जातो. याच उपक्रमांतर्गत श्री सकपाळ यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

आविष्कार फाउंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा निवड समिती सदस्य झिलू गोसावी यांनी निवडपत्राद्वारे श्री सकपाळ यांना पुरस्काराची माहिती दिली. रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आविष्कार फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार (पत्रकार) यांनी श्री सकपाळ यांनी उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारावा, असे कळविले आहे.

सुरेंद्र सकपाळ यांच्या या निवडीबद्दल क्रीडा क्षेत्रासह शैक्षणिक, सामाजिक व विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!