पालकमंत्री नितेश राणेंच्या सूचनेनुसार वैभववाडीतील जि.प. शाळांची पाहणी; १ सप्टेंबरपासून विशेष दौऱ्याला सुरुवात

वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार वैभववाडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक सुविधांचा आढावा घेण्यासाठी विशेष पाहणी दौरा १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. शाळांमध्ये आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा, त्यांच्या सद्यस्थितीची पाहणी करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे.
याबाबतचा निर्णय २५ ऑगस्ट रोजी पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वैभववाडी तालुका पंचायत समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार पंचायत समिती सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गटशिक्षणाधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी आदी मान्यवरांकडून तालुक्यातील एकूण ६३ जिल्हा परिषद शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन सुविधांची पाहणी करण्यात येणार आहे. प्रत्येक मान्यवरांकडून प्रत्येकी पाच शाळांची पाहणी करून त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे.
या पाहणी दौऱ्यात संबंधित शाळेतील वर्गखोल्यांची संख्या, वर्गखोल्यांची सद्यस्थिती, शाळेतील शौचालय व मुतारीची सुविधा, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प, सौरऊर्जा पॅनेल, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पाण्याची टाकी, वॉटर फिल्टर आदी विविध भौतिक सुविधांची तपासणी केली जाणार आहे. तसेच शाळांना भविष्यात आवश्यक असलेल्या अतिरिक्त सुविधांचाही आढावा घेतला जाणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शाळांमध्ये आवश्यक त्या भौतिक सुविधा असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे या पाहणीच्या माध्यमातून शाळानिहाय आवश्यकतांची निश्चित माहिती प्रशासनाकडे उपलब्ध होणार आहे. पाहणी पूर्ण झाल्यानंतर तयार करण्यात आलेल्या सविस्तर अहवालाच्या आधारे ज्या शाळांना ज्या सुविधांची आवश्यकता आहे, त्या सुविधा पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून शासनाकडून उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे यांनी सांगितले.
या विशेष पाहणी दौऱ्यामुळे वैभववाडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होऊन विद्यार्थ्यांना अधिक चांगले आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळण्यास मदत होणार आहे.

error: Content is protected !!