असनिये बेकायदा बंदूक गुन्ह्यात आणखी दोन संशयाच्या फेऱ्यात

बांदा (प्रतिनिधी) : असनिये येथे गावठी बनावटीची बंदूक आणि ९ जिवंत काडतुसे जप्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही संशयितांना न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या गुन्ह्यात बांदा परिसरातील अन्य दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांना ताब्यात घेण्यासाठी बांदा पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

सावंतवाडी पोलिसांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बांदा पोलिसांनी असनिये-वायंगणवाडी येथे छापा टाकून जयेंद्र अनिल सावंत (वय २७) याला गावठी बंदूक व ९ जिवंत काडतुसांसह रंगेहात पकडले होते. त्याची अधिक चौकशी केली असता ही बंदूक प्रसाद प्रभाकर कुबल (वय ४३, रा. नेतर्डे) याने दिल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तत्काळ चक्रे फिरवून प्रसाद कुबल याला ताब्यात घेतले. प्रसादने राजू गोपाळ पाटील (वय ३३, रा. कासारवर्णे, पेडणे-गोवा) यालाही बेकायदा बंदूक पुरवल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तिघांनाही बेड्या ठोकल्या.

तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी जयेंद्र सावंत व प्रसाद कुबल यांच्या घरांची झडती घेतली, मात्र तेथे कोणताही आक्षेपार्ह मुद्देमाल आढळला नाही. मुख्य पुरवठादार प्रसाद कुबल याला सावंतवाडी-माजगाव येथील बंदूक तयार करणाऱ्या कारखान्यात नेऊन पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा व पाहणी करण्यात आली. ही बंदूक त्याने कशी मिळवली आणि तिची वाहतूक कशी केली, या संपूर्ण घटनाक्रमाची पडताळणी करण्यात आली आहे.

हस्तगत केलेली ९ जिवंत काडतुसे नेमकी कोठून आणली, याचे गूढ अद्याप कायम आहे. हे रॅकेट कुठेपर्यंत पसरले आहे याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अतिरिक्त कोठडीची मागणी केली होती; त्यानुसार न्यायालयाने तिघांच्या पोलीस कोठडीत एका दिवसाची वाढ केली आहे. सध्या संशयितांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासले जात असून, गोवा व स्थानिक परिसरात अन्य कोणाला अशा बेकायदा बंदुका पुरवण्यात आल्या आहेत का, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

तपासात निष्पन्न झालेल्या नवीन दोन संशयितांच्या घरी पोलीस पथके जाऊन आली आहेत. हे दोघे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर या रॅकेटमधील आणखी काही मोठी नावे समोर येऊन नव्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

error: Content is protected !!