वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनातून जपली सामाजिक बांधिलकी
आचरा (प्रतिनिधी) : रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नव्हे, तर नाती, निसर्ग आणि समाजाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचीही संधी आहे, हे वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथील विद्यार्थ्यांनी आपल्या विविध उपक्रमांतून दाखवून दिले. रक्षाबंधनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, सामाजिक कृतज्ञता आणि देशसेवेचा संदेश देणारे उपक्रम राबवत या पवित्र सणाला सामाजिक बांधिलकीची अनोखी जोड दिली.
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात रक्षाबंधनानिमित्त विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रशालेतील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला.
यावेळी स्काऊट-गाईड विभागाच्या वतीने ‘वृक्ष रक्षाबंधन’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी कट्टा येथील पुरातन वृक्षाला राखी बांधून त्याच्या संरक्षणाची प्रतिज्ञा केली.
सामाजिक बांधिलकी जपत कट्टा बाजारपेठेतील रिक्षाचालक बांधव तसेच ग्रामीण रुग्णालय, कट्टा येथील डॉक्टर, आरोग्यसेवक व कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गाईडच्या विद्यार्थिनींनी त्यांना राखी बांधली.
कला विभागाच्या वतीने विद्यार्थिनींनी स्वतः आकर्षक राख्या तयार केल्या. रक्षाबंधनाच्या शुभेच्छांसह देशप्रेमाचा संदेश लिहिलेल्या या राख्या देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांना पाठविण्यात आल्या.
या उपक्रमासाठी कला व स्काऊट-गाईड विभागप्रमुख समीर चांदरकर, एन.सी.सी. विभागप्रमुख एकनाथ राऊळ, गाईड कॅप्टन सिमरन चांदरकर तसेच अन्य स्काऊट-गाईड शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
या स्तुत्य व समाजोपयोगी उपक्रमाबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर तसेच सर्व संचालक, मुख्याध्यापिका देवयानी गावडे आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
रक्षाबंधनाच्या धाग्यातून निसर्गरक्षण, सामाजिक कृतज्ञता आणि देशभक्तीची वीण गुंफत वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी समाजासमोर सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठेवले.













