पॅचवर्क अवघ्या १० मिनिटांत पूर्ण
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न जलद आणि टिकाऊ पद्धतीने सोडविण्यासाठी कोल्हापूर महापालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. ‘इन्स्टा रोड पॅचर’ अर्थात GIPSAT डांबर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खड्डे बुजविण्याचे काम अधिक वेगाने करता येणार असून, यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पापाची तिकटी-पानलाईन मुख्य रस्त्यावर या तंत्रज्ञानाचे विशेष प्रात्यक्षिक घेण्यात आले.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर आणि स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रात्यक्षिकाची पाहणी केली.
या तंत्रज्ञानाची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे एका खड्ड्याचे पॅचवर्क अवघ्या १० मिनिटांत पूर्ण करता येते. काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता तातडीने वाहतुकीसाठी खुला करता येत असल्याने रस्ता दुरुस्तीमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे या प्रक्रियेसाठी ट्रक, डंपर किंवा मोठ्या रोलरची आवश्यकता भासत नसल्याने कमी मनुष्यबळात दुरुस्तीचे काम करता येते.
मिश्रण गरम करण्याची आवश्यकता नसल्याने विविध हवामानात आणि सर्व ऋतूंमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. तसेच करण्यात आलेले पॅचवर्क किमान दोन वर्षे टिकण्याची क्षमता असल्याने वारंवार खड्डे बुजविण्यावर होणारा खर्च आणि मनुष्यबळाची गरज कमी होण्याची अपेक्षा आहे.
शहरातील खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रस्ते दुरुस्तीची कामे अधिक जलदगतीने करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, शहर अभियंता रमेश मस्कर, इन्स्टा रोड पॅचर कंपनीचे GIPSAT व्यवस्थापक आदर्श खोब्रागडे, उपप्रकल्प अभियंता आशिष घाटोळ, उपशहर अभियंता सुरेश पाटील, अरुणकुमार गवळी, निवास पोवार, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, संजय नागरगोजे आदी उपस्थित होते.










