बांदा (प्रतिनिधी) : एनसीएमसी कार्ड सक्तीच्या प्रश्नावरून बांद्यात संतापाचा उद्रेक झाला असून, कार्ड वितरणाची अपुरी व्यवस्था असताना सक्तीची अंमलबजावणी कशासाठी, असा सवाल करत बांदा मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आज बांदा बसस्थानकावर वाहतूक नियंत्रक प्रकाश नार्वेकर यांना जाब विचारला. १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी प्रवास सवलतीसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात कार्ड उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक प्रवाशांनी नोंदणी करूनही कार्ड मिळालेले नाही, तर कार्ड रीड न होणे, नेटवर्क व तांत्रिक अडचणींमुळे प्रवासी आणि वाहकांमध्ये वादाचे प्रकार घडत आहेत. बांदा शहरासाठी नेमलेला एजंट उपलब्ध नसल्याने तसेच नवीन एजंटसाठी ३० हजार रुपये अनामत रक्कम भरण्याची अट असल्याने नवीन एजंट मिळत नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे १०० टक्के कार्ड वितरण होईपर्यंत पूर्वीची सवलत व्यवस्था सुरू ठेवावी, बसस्थानकावर स्वतंत्र एनसीएमसी काउंटर व पुरेसे एजंट उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. या समस्येवर तातडीने तोडगा न निघाल्यास बुधवारी (२ सप्टेंबर) सकाळी १० वाजता बांदा बसस्थानकातून एकही एसटी बस बाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला. यावेळी मराठा समाजाचे अध्यक्ष परिमल सावंत, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, शामू धुरी, मनसे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत, माजी अध्यक्ष नीलेश मोरजकर, गुणेश गवस, अजय कोठावळे आदी उपस्थित होते.
एनसीएमसी कार्ड सक्तीवरून बांद्यात संताप; बुधवारी एसटी वाहतूक रोखण्याचा इशारा









