श्रुती तावडे प्रथम; अनुष्का सुतार उत्तेजनार्थ प्रथम, तर नैना कदम उत्तेजनार्थ तृतीय
खारेपाटण (प्रतिनिधी) : ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वरवडे तसेच डॉ. राज अहमद हुसेन शाह पटेल चॅरिटेबल ट्रस्ट, हरकुळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय ‘श्रावणधारा’ सुगम संगीत गायन स्पर्धेत शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, खारेपाटणच्या विद्यार्थिनींनी आपल्या सुमधुर स्वरांनी रसिकांची मने जिंकत नेत्रदीपक यश संपादन केले.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रशालेची गुणवान विद्यार्थिनी कु.श्रुती संजय तावडे हिने प्रथम क्रमांक पटकावत खारेपाटण हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. त्याचप्रमाणे कु. अनुष्का विनोद सुतार हिने उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक,तर कु. नैना विजय कदम हिने उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक मिळवत आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली. विद्यालयाची विद्यार्थिनी कु. ईश्वरी तानाजी कदम हिनेही अंतिम फेरीत अत्यंत सुरेल व प्रभावी सादरीकरण करत परीक्षकांची दाद मिळवली.
खारेपाटण प्रशालेच्या चारही विद्यार्थिनींच्या उल्लेखनीय कामगिरीचे स्पर्धेचे परीक्षक, ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक व ऑर्गन वादक श्री. माधव गावकर सर तसेच युवा शास्त्रीय गायक प्रफुल्ल रेवंडकर यांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थिनींच्या आवाजातील गोडवा, सुरांची अचूकता, तालाचे भान आणि सादरीकरणातील आत्मविश्वास यांचे परीक्षकांनी विशेष अभिनंदन केले.
या यशामागे प्रशालेचे संगीत शिक्षक संगीत अलंकार संदिप पेंडुरकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या नियमित सरावाला योग्य दिशा देत त्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशालेच्या वतीने चारही यशस्वी विद्यार्थिनींचा विशेष कौतुक सोहळा आयोजित करून गौरव करण्यात आला.यावेळी कणकवली गट साधन केंद्राच्या तृप्ती पारकर, निलेश जाधव . केंद्रप्रमुख खारेपाटण – सचिन जायभाय, खारेपाटण केंद्रशाला नं.१ मुख्याध्यापिका -आरती जोजन,प्राथमिक शिक्षक गोरक्षनाथ गायकवाड ,तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.विद्यार्थिनींच्या या यशामुळे खारेपाटण हायस्कूलच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच कलाविषयक उपक्रमांचीही उज्ज्वल परंपरा अधोरेखित झाली आहे. अभ्यासाबरोबरच संगीत, कला व सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रशालेच्या प्रयत्नांचे हे यशस्वी फलित मानले जात आहे.सुरांच्या विश्वात खारेपाटणच्या कन्यांनी उमटवलेला हा यशस्वी स्वर जिल्हाभर दुमदुमत असून, त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










