स्थायी समिती सभेत प्रशासनाविरोधात सदस्य आक्रमक
ओरोस (प्रतिनिधी) : शाळा दुरुस्ती, जलजीवन मिशन कामांची बिले अडकवून ठेवल्याने तसेच कर्मचाऱ्यांची मेडिकल बिले पास न केल्याने मंगळवारी झालेल्या स्थायी समिती सभेत प्रशासन विरुद्ध सदस्य वाद रंगला. या कारणावरून सदस्य मनोज रावराणे, रुपेश कानडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर दिव्यांग कर्मचारी खोटे प्रमाणपत्र आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी कर वसुलीचा अहवाल खोटा दिल्याचा आरोप करीत संदेश सावंत यांनी ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांना कोंडीत पकडले.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बुधवारी दुपारी प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, उपाध्यक्ष तुकाराम साईल, सभापती संतोष साटविलकर, प्रितेश राऊळ, अनुराधा नारकर, रुहिता तांबे, समिती सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, प्रकल्प संचालक डॉ उदय पाटील यांच्यासह सदस्य आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सरोज परब यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.












