गणेशोत्सवापूर्वी ग्रामीण भागातील सर्व पाणी स्रोतांचे शुद्धीकरण करण्याच्या सूचना
ओरोस (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घेतलेल्या पाणी नमुने तपासणीत जिल्ह्यातील शाळांचे, शासकीय रुग्णालयातील उपहारगृह, प्रसूती गृहातील पाणी नमुने दूषित आल्याने मंगळवारी झालेल्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती सभेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. शाळेतील मुले, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बुधवारी दुपारी प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा संपन्न झाली. यावेळी समिती सचिव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, उपाध्यक्ष तुकाराम साईल, सभापती संतोष साटविलकर, प्रितेश राऊळ, अनुराधा नारकर, रुहिता तांबे, जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुदेश राणे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सरोज परब यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
दूषित पाणी नमुने अहवाल वाचन वेळी जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी अहवालाचे वाचन केले. यानंतर सदस्य मनोज रावराणे यांनी दूषित नमुने आलेल्या पूर्ण यादीचे वाचन केले. यामध्ये शाळा, रुग्णालयांतील उपहारगृह आणि प्रसूती गृहातील पाणी नमुने दूषित आले असल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. यावर उपाध्यक्ष साईल, सभापती साटविलकार, राऊळ यांनीही चर्चेत सहभागी होत याबाबतचे गांभीर्य व्यक्त केले. रुग्णालयात आलेले दूषित पाणी हे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अधिनस्त रुग्णालयात दूषित आले असून त्याची यादी जिल्हा शल्य चिकित्सकांना देण्यात आल्याचे डॉ धुरी यांनी सांगितले. यावेळी उपहारगृह, प्रसूतिगृह तसेच अन्य ठिकाणी वॉटर फिल्टर बसविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच तेथील पाणी तत्काळ शुद्धीकरण करावे, अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी उपाध्यक्ष साईल यांनी, गणेशोत्सव पूर्वी ग्रामीण भागातील पाण्याचे सर्व उद्भव शुद्धीकरण करून घेण्यात यावे. तसेच पाणी स्रोतांचा परिसर स्वच्छ करावा, अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.












