सिंधुदुर्ग एलसीबीची कारवाई
देवगड (प्रतिनिधी) : शिरगाव-साटमवाडी येथे वृद्ध महिलेच्या गळ्यातील तब्बल १ लाख ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची माळ हिसकावून पळून गेलेल्या आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने डोंबिवली येथे सापळा रचून शिताफीने जेरबंद केले. तन्मय राजेंद्र साटम (वय २९, मूळ रा. शेवरे, शिरगाव, ता. देवगड, सध्या रा. डोंबिवली) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
शिरगाव-साटमवाडी येथे १६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली होती. जयश्री सदाशिव बावसकर यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ अज्ञात व्यक्तीने हिसकावून चोरून नेली होती. याप्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०४(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. तपासादरम्यान मानवी कौशल्य, सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. आरोपी डोंबिवली येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने गणेशनगर परिसरात सापळा रचून १ सप्टेंबर रोजी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, तन्मय साटम याच्याविरुद्ध यापूर्वी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हाही दाखल असून, त्या गुन्ह्यात तो पाहिजे आरोपी असल्याचे तपासात समोर आले आहे.
गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपीची आवश्यकता असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून २ सप्टेंबर रोजी पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी देवगड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक सनिल पाटील, एएसआय राजेंद्र जामसंडेकर, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर तवटे, आशिष गंगावणे आणि किरण देसाई यांच्या पथकाने ही कारवाई केली.










