ओपीडीसमोर हात पकडून धमकावल्याची तक्रार; दुसऱ्या माजी अधिष्ठात्याविरुद्ध पोलिसांत नोंद
ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दोन माजी अधिष्ठात्यांमधील वाद मंगळावर (ता. १) थेट ओपीडीसमोर उफाळून आला. एका माजी अधिष्ठात्याचा हात पकडून त्यांना असभ्यपणे धमकावल्याची तक्रार दुसऱ्या माजी अधिष्ठात्याविरोधात करण्यात आली असून, या प्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, सोमवारी दुपारी १.१० वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातील ओपीडी क्रमांक नऊसमोर हा प्रकार घडला.शरीररचना शास्त्र विभागाचे प्राध्यापक तथा माजी अधिष्ठाता डॉ. मनोज जोशी यांनी आपला हात पकडला आणि असभ्यपणे धमकीच्या स्वरात बोलण्यास सुरुवात केली, असे डॉ. डवंगे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर त्यांनी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात लेखी अर्ज दिला.
या तक्रारीच्या आधारे बुधवारी (ता. २) दुपारी १२.२४ वाजता सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला गेला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५१(१) अन्वये धमकी दिल्याप्रकरणी ही नोंद करण्यात आली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातील दोन माजी अधिष्ठात्यांमधील वाद अशा प्रकारे ओपीडी परिसरात समोर आल्याने महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. वरिष्ठ पदांवर काम केलेल्या दोन डॉक्टरांमधील वाद आता थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचल्याने या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे.
या प्रकरणाची नोंद महिला पोलिस नाईक भोसले यांनी केली आहे. घटनेनंतर कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसल्याचे सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी स्पष्ट केले.











