धामापूर भगवती मंदिर परिसरातील पिंपळ वृक्ष कोसळून नुकसान

चौके (प्रतिनिधी) : जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या मालवण तालुक्यातील धामापूर तलाव व श्री देवी भगवती मंदिर परिसरातील सुमारे 350 वर्षे जुन्या भल्या मोठया पिंपळ वृक्षाची मोठी फांदी रविवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता कोसळून भगवती मंदिर शेजारी असलेल्या श्री देवी सातेरी मंदिरासमोरील मंडप आणि मुख्य प्रवेशद्वारावरील कमानीचे मोठे नुकसान झाले. तसेच परिसरातील विद्युत पोल व तारा तुटून वीज वितरणचेही नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेवेळी मंदिर परिसरात कोणी उपस्थित नसल्यामुळे जीवित हानी टळली.

दरम्यान या दुर्घटनेची माहिती मिळताच धामापूर सरपंच मानसी परब यांनी घटनास्थळी धाव घेतली व तलाठी समीरा सावंत, पोलीस पाटील विनायक प्रभु, वायरमन सागर गावठे, योगेश काळसेकर यांना दूरध्वनी करून दुर्घटनास्थळी बोलवून त्यानंतर तलाठी समीरा सावंत यांनी नुकसानीचा पंचनामा केला व वायरमन सागर गावठे, योगेश काळसेकर यांनी वीज वितरणच्या टीम ला सोबत घेऊन अवघ्या दोन तासात वीज पुरवठा पूर्ववत केला. यावेळी सरपंच मानसी परब यांच्या समवेत उपसरपंच रमेश निवतकर, दत्तात्रय देसाई, माजी सरपंच ज्ञानेश्वर परब, दिपक गावडे, सचिन मराठे, ओमकार सुतार, दिनेश गावडे, संदीप राऊळ, भालचंद्र परब, प्रवीण परब, प्रशांत परब, महेश परब, बापू देसाई, सुनील देसाई, सिद्धेश परब, सुधीर नाईक, विनय मराठे, संतोष मराठे, श्यामसुंदर परब आदी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी उपस्थित स्थानिक तरुणांनी मदतकार्य करून कोसळलेली फांदी तोडून बाजूला केली व धोकादायक बनलेला उर्वरित वृक्ष लवकरच तोडावा अशी मागणी केली. सुट्टीचा दिवस असूनही तातडीने पंचनाम्यासाठी उपस्थित राहिलेल्या तलाठी समीरा सावंत आणि वीज पुरवठा सुरळीत करणारे वायरमन सागर गावठे आणि योगेश काळसेकर यांचे उपस्थित नागरिकांनी विशेष आभार मानले.

error: Content is protected !!