६ विद्यार्थ्यांची इस्रो चाचणी मुख्य परीक्षेसाठी निवड
खारेपाटण (प्रतिनिधी) : शालेय विद्यार्थ्यांना अंतराळयान विषयी माहिती मिळण्याच्या दृष्टीने तसेच त्यांच्यामध्ये जिज्ञासू वृत्ती वाढीस लागण्याच्या अपेक्षेने ऋग्वेद हेल्थ फाउंडेशन बारामती यांच्या वतीने सन २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या डायमंड टॅलेंट सर्च (DTSE) परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून विद्यार्थ्यांच्या या अतुलनीय यशा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
या स्पर्धा परीक्षेत प्रशालेतील एकूण २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यापैकी ६ विद्यार्थ्यांनी विशेष नैपुण्य प्राप्त करत संस्थेच्या वतीने पुढे होणाऱ्या इस्रो चाचणी परीक्षे करीता पात्र ठरले आहेत. नुकतेच या गुणवंत विद्यार्थ्यांचा केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे DTSE परीक्षेचे समन्वयक यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे उपाध्यक्ष संध्या पोरे, मुख्याध्यापक आरती जोजन यांचे शुभहस्ते प्रशस्तिपत्र ट्रॉफी देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
डायमंड टॅलेंट सर्च परीक्षेत विशेष नैपुण्य प्राप्त करीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे – कु. अन्वि गिरीश मोरे (इयत्ता – २ री), चिरायू मिथुन शेंगाळे, स्वयंम हर्षल पोरे (इयत्ता ३ री), राहत कादिर काझी (इयत्ता ४ थी), कु. सांची संतोष पाटणकर व कु. अन्वी निशिकांत शिंदे (इयत्ता – ७ वी) या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांची सन २०२७ मध्ये इस्रो मुख्य चाचणी परिक्षेकरीता निवड झाली आहे. तर DTSE या परिक्षेत बेस्ट ऑफ बेस्ट ड्रॉइंग मध्ये शौर्य महेंद्र पवार, अनम काझी या विद्यार्थांनी विशेष नैपुण्य प्राप्त केले. तसेच गुरुराज ब्रम्हदंडे व समर्थ कदम बेस्ट ऑफ निबंध मध्ये यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल जिल्हा परिषद सदस्या प्राची ईसवलकर, पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर प्राप्ती कट्टी तसेच सर्व समिती सदस्य व पालक आणि शिक्षकांच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.












