खेबुडकर पुण्याला; बासूर सिंधुदुर्गात

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अपूर्वा बासूर; शासनाचे आदेश

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची पुणे येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी पालघर जिल्ह्यातील जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर (भाप्रसे) यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज (ता. ३) याबाबत आदेश जारी केले. बासूर यांनी सध्याच्या पदाचा कार्यभार पी. के. सिद्धार्थ रामकुमार (भाप्रसे) यांच्याकडे सोपविल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार खेबुडकर यांच्याकडून त्वरित स्वीकारावा, असे आदेशात म्हटले आहे.

खेबुडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून १७ मार्च २०२५ रोजी पदभार स्वीकारला होता. सुरुवातीला त्यांना प्रशासक म्हणून कारभार हाकता आला होता. विविध विकासकामांना गती देण्याबरोबरच प्रशासकीय कामकाजावर भर दिला होता. परंतु कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी त्यांची बदली jhali आहे, आता त्यांच्याकडे पुणे येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, अपूर्वा बासूर या सध्या जव्हार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तसेच सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शासनाच्या आदेशानुसार त्या लवकरच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

खेबुडकर यांच्या बदलीमुळे जिल्हा परिषद प्रशासनात नेतृत्वबदल होणार आहे. त्यामुळे ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा तसेच विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीची महत्त्वाची जबाबदारी आता बासूर यांच्याकडे येणार आहे. दरम्यान, आपण शासनाकडे चार महिन्यापूर्वी बदली मागितली होती. त्यानुसार बदली झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा काम करण्यासाठी खूप चांगला आहे. या जिल्ह्यात खोटे करता येत नाही. येथील नागरिक पूर्णपणे जागृत आहेत. तसेच राजकीय दबाव राहत नाही. नियमानुसार काम करण्यास संधी मिळते, अशी प्रतिक्रिया खेबुडकर यांनी बदली झाल्यानंतर व्यक्त केली.

error: Content is protected !!