फोन, व्हॉट्सॲप संदेश व धमकीप्रकरणी न्यायालयाचा निकाल
ओरोस (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीला फोन करणे, व्हॉट्सॲपवर संदेश पाठविणे, प्रेमाची मागणी करणे तसेच नकार दिल्यानंतर धमकी देऊन वारंवार पाठलाग केल्याच्या आरोपातून समीर मनोहर जाधव (रा. काळवण, ता. मालवण) यांची ओरोस येथील विशेष सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
याप्रकरणी निवती पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान तसेच पोक्सो अधिनियम कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी पक्षाच्या आरोपानुसार, आरोपीने आपल्या मोबाईलवरून अल्पवयीन पीडित मुलीच्या आईच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे संदेश पाठवून तसेच फोन करून संपर्क साधला होता. त्यानंतर पीडितेला फोन करून प्रेमाची मागणी केली. पीडितेने त्यास नकार दिल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना व्हॉट्सॲप चॅटिंग दाखवून तिच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगण्याची धमकी दिल्याचा आरोप होता. आरोपीने वारंवार फोन, संदेश तसेच पाठलाग करून त्रास दिल्याचाही आरोप करण्यात आला होता.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून सात साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. बचाव पक्षाने साक्षीदारांच्या जबाबातील बाबी, उपलब्ध पुरावे तसेच गुन्ह्याची फिर्याद दाखल करण्यास झालेला विलंब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. पाठलाग आणि धमकीचे आरोपही उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संशयाच्या पलीकडे सिद्ध होत नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांचा विचार करून विशेष न्यायाधीश एस. टी. निपोळी यांनी २ सप्टेंबरला समीर जाधव यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी मुख्य काम पाहिले. त्यांना अॅड. नामदेव मठकर, अॅड. पंकज खरवडे, अॅड. विनय रजपूत, अॅड. कैस शेख, अॅड. भूषण कदम आणि अॅड. हरेश वरवडेकर यांनी सहकार्य केले.











