मुला मुलींच्या कार्यशिल्पातून इतिहासाचा आनंद पालक आणि कुडाळवासियांनी अनुभवला !
प्रशालेच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक !
फोंडाघाट (कुमार नाडकर्णी) : आज आपला समाज इतिहासातील घटना, प्रसंग आणि पारंपारिक शास्त्र यावर उद्याची मार्गक्रमण करीत असतो. आजच्या एआय आणि अमर्याद सोशल मीडियाच्या जमान्यात, नव्या पिढीला किंबहुना जेनझी ला इतिहासाचे महत्त्व समजणे आणि त्यातून बोध घेऊन कार्यवाही केल्यास समाजभानाची जाणीव होणे ही काळाची गरज ठरणार आहे. त्या दृष्टीने क.म.शि.प्र. मंडळ कुडाळच्या, इंग्रजी माध्यमिक प्रशालेत ऐतिहासिक हिस्ट्री प्रदर्शनाला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि कुडाळवासियांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. सर्वांनी प्रशालेच्या शिक्षक वर्गाचे आणि प्रदर्शनात सहभागी विद्यार्थी- विद्यार्थिनींचे कौतुक केले …
प्रदर्शनाचे उद्घाटन एड. अमोल सामंत यांचे हस्ते झाले. संस्थेचे कार्याध्यक्ष अरविंद शिरसाट,उपाध्यक्ष का.आ. सामंत, इंग्रजी विभागाच्या शाळा समितीचे प्रमुख महेंद्र गवस, सदस्या पाटणकर, मुख्या. विपिन वराडे, रंजन तेली ,अजित व्हनमाने, इंग्रजी माध्यम मुख्या. मुमताज शेख, पालक प्रतिनिधी उपस्थित होते..
अभ्यासातील विषय म्हणून इतिहासाकडे न पाहता परंपरा, संस्कृती आणि सामाजिक परिवर्तनाचा तो एक पुरावा आहे.त्यामुळे या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांची कल्पकता आणि संशोधनातून ऐतिहासिक चित्रे, शिवकालीन गड- किल्ल्याच्या, लेणी, मंदिराच्या प्रतिकृती यांचा सुरेख मेळ दिसून आला. भारतीय चलनाच्या आज वरचा थकीत करणारा प्रवास, लेखन लिपी लक्षवेधी ठरली. हम्पीचा श्रद्धेय रथ,एलोरा लेणी, कोणार्क मंदिर, कलिंग युद्ध, सामाजिक व्यवस्थापन याची कला शिल्पे आणि त्यांची माहिती अभ्यासपूर्ण सांगण्याची लकब विद्यार्थी विद्यार्थिनींनी यशस्वी सांभाळली. अश्मयुगातील मानवी जीवन, कलांचा इतिहास, शेतीची लोप पावत चाललेली अवजारे व साहित्य दैनंदिन वापरातील वस्तू यांचा प्रवास, महत्त्वपूर्ण संवेदनशील घटना, हल्ल्याच्या- युद्धाच्या प्रतिकृतीमुळे आपल्या शिल्पातून आणि ओघवत्या वक्तृत्वातून लक्षवेधी ठरली. त्यामुळे उपस्थितांनी इतिहासाचा जिवंत अनुभव घेत कौतुक केले.
प्रवेशद्वारावरील स्वागत फलक आणि रांगोळीचे येणाऱ्या प्रत्येकाने कौतुक केले.सूत्रसंचालन इशिका वारंग तर आभार प्रदर्शन प्रज्ञा जोशी यांनी केले. शाळेच्या मुख्या. संपदा कामत, इतिहास विभाग प्रमुख उत्तम रासम, सानवी कुडाळकर यांनी या ऐतिहासिक प्रदर्शनाचे नियोजन व मुला- मुलींना मार्गदर्शन केले.आपल्या पाल्याचे ऐतिहासिक प्रदर्शनात पाहणे, अनुभवणे आणि त्यांनी साकारलेल्या प्रतिकृतीचे मान्यवरांनी केलेले कौतुक “याची देही याची डोळा” सर्जनशील तेथून व्यक्त होणे हा अनुभव सर्वांनाच प्रेरणादायी ठरला.सकाळी अकरा ते सायंकाळी साडेचार पर्यंत या हिस्टॉरिकल प्रदर्शनाला कुडाळात सर्वत्र उस्फुर्त प्रतिसाद आणि कौतुक लाभला…












