कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भटक्या-विमुक्त व मांग-गारुडी समाजाचे जेष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते शामराव सकट यांचे काल रात्री दुःखद निधन झाले.
हातावर पोट घेऊन फिरणाऱ्या, गावोगावी भटकणाऱ्या मांग-गारुडी, भटक्या-विमुक्त समाजाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थिर करून त्यांना न्याय, संरक्षण व हक्क मिळवून देण्याचे मोलाचे कार्य कै. शामराव सकट यांनी केले. त्यांनी आयुष्यभर उपेक्षित समाजाच्या न्यायासाठी संघर्ष केला.
फुले-शाहू-आंबेडकर चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. जिल्ह्यातील प्रत्येक जन-लढ्यात, मोर्चात, आंदोलनात त्यांचा कायम पुढाकार राहिला आहे. अन्यायाविरुद्ध ते नेहमीच ठामपणे उभे राहायचे.
त्यांच्या जाण्याने पुरोगामी व आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे, अशा भावना ॲड. सुदीप कांबळे व नगरसेवक लुकेश कांबळे यांनी व्यक्त केल्या आहेत. सामाजिक चळवळीतून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अंत्ययात्रा आज
कै. शामराव सकट यांची अंत्ययात्रा आज दि. 04/09/2026 रोजी दुपारी 12 वाजता त्यांच्या राहत्या घरापासून, सिद्धार्थ नगर, कणकवली येथून निघणार आहे.
समाज बांधवांनी व चळवळीतील कार्यकर्त्यांनी अंत्ययात्रेस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.











