जिल्हा परिषदस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा; आठ शिक्षकांची निवड

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. आठही तालुक्यांतून आलेल्या एकूण १९ प्रस्तावांमधून आठ शिक्षकांची निवड करण्यात आली. शिक्षक दिनाचे औचित्य साधून या पुरस्कारांची घोषणा करण्यात aale असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिली.

यावेळी शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुबोध माने उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत दरवर्षी प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली जाते. यंदा या पुरस्कारासाठी दोडामार्ग व कुडाळमधून प्रत्येकी तीन, तर देवगड, कणकवली, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि वैभववाडी तालुक्यांतून प्रत्येकी दोन, असे एकूण १९ प्रस्ताव प्राप्त झाले होते.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय निवड समितीने प्राप्त प्रस्तावांचे निकषांनुसार मूल्यमापन केले. त्यातून प्रत्येक तालुक्यातील एका शिक्षकाच्या नावाची शिफारस करण्यात आली. त्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी कोकण विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला होता. विभागीय आयुक्तांची मान्यता मिळाल्यानंतर गुरुवारी पुरस्कारार्थींची नावे जाहीर करण्यात आली.

कणकवली तालुक्यातून सुशांत सुभाष मगज नरडवे नंबर १, सावंतवाडीतून निता नितीन सावंत कुणकेरी नंबर ३, दोडामार्गमधून रामा शिवा गवस घोटगे नंबर १, वेंगुर्ल्यातून प्राजक्ता प्रशांत आपटे वेंगुर्ला नंबर २, कुडाळमधून अस्मिता अविनाश कुडाळकर नेरूर दुर्गवाडा, देवगडमधून उत्तम नामदेव मोहिते कसबा वाघोटण, वैभववाडीतून दत्तात्रय शांताराम माईणकर तिरवडे तर्फ खारेपाटण तर मालवणमधून उन्नती बाळकृष्ण कराळे तिरवडे यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

राष्ट्रीय अथवा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी यापूर्वी निवड झालेल्या शिक्षकांचा विचार जिल्हा पुरस्कारासाठी केला जात नाही. शासनाने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे शिक्षकांच्या शैक्षणिक व अन्य उल्लेखनीय कामगिरीचे मूल्यमापन करून जिल्हास्तरीय निवड केली गेली आहे, असे अध्यक्ष कामत यांनी सांगितले. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या या पुरस्कारांमुळे जिल्ह्यातील आठ शिक्षकांच्या शैक्षणिक कार्यावर गौरवाची मोहोर उमटली आहे.

error: Content is protected !!