सावंतवाडी (प्रतिनिधी) : गोवा येथे आयोजित राज्यस्तरीय शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सावंतवाडीची कन्या कु. अवनी भांगले हिने चार सुवर्णपदके पटकावली आहेत. एकाच स्पर्धेत चार सुवर्णपदकांवर नाव कोरून तिने ऐतिहासिक कामगिरी केली असून स्पर्धेतील सर्वोच्च ‘मास्टर शूटर’चा बहुमानही संपादन केला आहे. तिच्या या अफाट यशामुळे क्रीडा जगतातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अवनी ही आंतरराष्ट्रीय शूटिंग प्रशिक्षक, पंच तथा नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे कोषाध्यक्ष अॅड. विक्रम भांगले यांची कन्या आहे.
या स्पर्धेत तिने १० मीटर पिस्टल प्रकारात दोन सुवर्णपदके मिळवली. याशिवाय अत्यंत आव्हानात्मक आणि कौशल्यपूर्ण मानल्या जाणाऱ्या २५ मीटर स्टँडर्ड पिस्टल आणि २५ मीटर स्पोर्ट्स पिस्टल या फायर आर्म्स प्रकारांतही प्रत्येकी एक सुवर्णपदक पटकावून तिने आपल्या अचूकतेची आणि एकाग्रतेची चमक दाखवून दिली.
१० मीटर आणि २५ मीटर अशा दोन्ही प्रकारांतील अष्टपैलू कामगिरीची दखल घेत तिला ‘मास्टर शूटर’ या मानाच्या किताबासह दोन भव्य ट्रॉफी आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
अवनीने यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये विशेष चमक दाखविली होती, मात्र या स्पर्धेतील तिचे प्रदर्शन क्रीडाप्रेमींना थक्क करणारे ठरले. तिचे सातत्य, कठोर सराव आणि वडिलांचे मार्गदर्शन या यशामागे महत्त्वाचे ठरले असून, ही कामगिरी तिच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरेल.












