५३ लाभार्थ्यांची नेत्र तपासणी
वैभववाडी (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील नागरिकांचे नेत्र आरोग्य सुदृढ राहावे आणि डोळ्यांच्या आजारांचे वेळेत निदान व्हावे, या उद्देशाने आखवणे येथील आरोग्य उपकेंद्रात आयोजित नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल ५३ लाभार्थ्यांची नेत्र तपासणी करून त्यांना आवश्यक आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला. तसेच कुष्ठरोग, हत्तीरोग व असंसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती करण्यात आली.
आरोग्य उपकेंद्र आखवणे, ग्रामपंचायत आखवणे, भोम-नागपवाडी पुनर्वसन गावठाण तसेच विवेकानंद नेत्रालय व रेटिना सेंटर, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य उपकेंद्र आखवणे येथे या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये ५३ लाभार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर संबंधितांना आवश्यक आरोग्यविषयक सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नागरिकांना असंसर्गजन्य आजार, कुष्ठरोग व हत्तीरोग यांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वेळेवर उपचार घेण्याचे महत्त्व याबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
यावेळी ६० वर्षांवरील लाभार्थ्यांचे आरोग्य मूल्यांकन फॉर्मही भरून घेण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीसह विविध आजारांबाबत करण्यात आलेल्या मार्गदर्शनामुळे शिबिर उपयुक्त ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे, सुवर्णा संसारे, मांगवलीचे माजी सरपंच राजेंद्र राणे, महेश संसारे, ग्रामपंचायत अधिकारी अनिल घुगे, माजी सरपंच अकाराम नागप, पोलीस पाटील यशवंत नागप, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मारुती कांबळे, अभय कांबळे, आरोग्य सहाय्यक रामा राठोड, समुदाय आरोग्य अधिकारी अभिषेक घट्टे, आरोग्य सेवक प्रदीप पवार, आरोग्य सहाय्यिका रूपाली पावसकर तसेच आशा स्वयंसेविका रुचिता कांबळे व संचिता सावंत आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अभय कांबळे यांनी मानले











