उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या पुढाकारातून उपक्रम
माजी आमदार वैभव नाईकांची उपस्थिती
कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांनी सोमवारी कणकवली महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कणकवलीचे उपनगराध्यक्ष तथा उबाठा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास माजी आमदार वैभव नाईक यांनीही उपस्थिती दर्शविली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित सिनेट सदस्यांसमोर पोटतिडकीने विविध समस्या मांडल्या.

याप्रसंगी सुशांत नाईक यांच्याभह नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे, प्राचार्य युवराज महालिंगे, प्रा. सोमनाथ कदम, सिनेट सदस्य मिलिंद साटम, डॉ. धनराज खोचाडे, ॲड. अल्पेश भोईर, स्नेहा गावडे, मयूर पांचाळ, उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख राजू राठोड, तेजस राणे, कलमठ ग्रा. पं. सदस्य धीरज मेस्त्री आदी उपस्थित होते.

यावेळी वैभव नाईक म्हणाले, मुंबई विद्यापीठ जगातील उत्कृष्ट विद्यापीठांपैकी एक आहे. म्हणून विद्यार्थ्यांचे प्रश्न समजूक घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या उबाठा प्रणीत सिनेट सदस्यांनी आज येथे भेट दिली आहे. कारण विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम काय होतो, हे आपण अलिकडेच झालेल्या विविध आंदोलनांतून पाहीले आहे. ‘झेन झी’समोरील समस्या खूप वेगळ्या आहेत. मात्र, समस्यांवर मात कष्टाने, शिक्षणानेच करता येऊ शकते. आज येथे उपस्थित असलेले सदस्य हे देखील चळवळीतूनच पुढे आले आहेत, असे नाईक यांनी आवर्जू सांगितले.

सुशांत नाईक म्हणाले, विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सिनेटचे सदस्य महाविद्यालयांमध्ये जातात, असे कधी दिसत नाही. मात्र, आमचे उबाठा प्रणीत सिनेट सदस्य आज थेट तुमच्यापर्यंत आले आहेत. तुमच्या मतांवर निवडून आलो, याची जाणिव या सिनेट सदस्यांना आहे. साहजिकच तुमच्या अडचणी विद्यापीठ स्तरावर सोडविण्यासाठी हे सदस्य नक्कीच प्रयत्नशील राहतील.

अल्पेश भोईर म्हणाले, विद्यार्थी आणि विद्यापीठ यांच्यातील दुवा म्हणजे सिनेट सदस्य. अलिकडे अशी परिस्थिती झाली की विद्यार्थ्यांविषयी कुणाला काहीच देणेघेणे नसल्याचे दिसून आले. मात्र, पेपर फुटीनंतर जंतरमंतरवरील आंदोलनातून ‘झेन झी’ने ताकद दाखवून दिली. तर भारतातील युवा वर्ग किती आत्मचिंतन करतो, हे देखील जगाला दिसले. ‘झेन झी’ने खोट्या प्रचाराला उद्ध्वस्त केले आहे. अर्थातच ही पिढी समस्यामुक्त रहावी, या उद्देशाने आम्ही येथे आलो.

मिलिंद साटम म्हणाले, मुंबई हे १६० वर्षे जुने विद्यापीठ आहे. देशभरात या विद्यापिठाची खास ओळख आहे. आज देशातील स्थितीत बघितली तर पाच टक्के एवढ्याच पदवीधरांसाठी रोजगार शिल्लक आहे. साहजिकच कौशल्य, छंदातून करीयर करणे या बाबीही महत्वाच्या ठरताहेत. वास्तविक भारतात सर्वाधिक लोकसंख्या ही २६ ते ३० वर्षे वयोगटातील आहे. तर ही पिढी देखील देशातील सत्ताधार्यांना हलविणारी असल्याचे आपण नुकतेच विविध आंदोलनातून पाहीले आहे.

यावेळी विद्यार्थ्यांनीही सिनेट सदस्यांसमोर विविध समस्यांचा पाढा वाचला. यामध्ये ऐनवेळी अभ्यासक्रमात झालेले बदल, एकाच वेळी विविध फी भरण्याचे प्राकार, डिजिटल स्वरुपातील अभ्यासक्रासाठी आवश्यक बाबींची पुर्तता असे मुद्दे होते. हे सर्व मुद्दे विद्यापीठ स्तावर मांडले जातील, असे आश्वासन सिनेट सदस्यांनी दिले.










