कवी नारायण सुर्वे यांनी व्यवस्थेलाच विचारले थेट प्रश्न

कवितेतून कष्टकरी, कामगार आणि वंचितांच्या वेदनांना दिला आवाज : कवयित्री प्रमिता तांबे

वैभववाडी (प्रतिनिधी) : कष्टकरी, कामगार, शोषित आणि वंचितांच्या वेदनांना आपल्या शब्दांतून आवाज देत कविवर्य नारायण सुर्वे यांनी मराठी कवितेला जनसामान्यांच्या जीवनाशी जोडले. अन्यायाविरोधातील बंडखोरी आणि माणसाविषयीची अथांग करुणा यामुळे त्यांच्या कविता सर्वकालीन ठरल्या. कविता लिहिताना त्यांनी तत्कालीन व्यवस्थेलाच थेट प्रश्न विचारले, असे प्रतिपादन कवयित्री प्रमिता तांबे यांनी केले.

अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंचतर्फे वैभववाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन सभागृहात वैभववाडी-हेतचे सुपुत्र कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी स्मृतिप्रीत्यर्थ कवयित्री प्रमिता तांबे यांच्या अध्यक्षतेखाली ‘श्रावणसरी’ या साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला साहित्यप्रेमींसह नव्या-जुन्या कवींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी बोलताना कवयित्री प्रमिता तांबे म्हणाल्या की, कविवर्य नारायण सुर्वे यांनी मराठी कवितेला दिवाणखान्यातून बाहेर काढून ती गिरणगावातील चाळींमध्ये आणली. कारखान्यांच्या धुराड्यांच्या छायेत उभ्या असलेल्या कामगारांच्या जीवनाशी कवितेचे नाते जोडले. कष्टकरी, कामगार आणि पददलितांच्या झोपड्यांमध्ये कविता नेऊन त्यांनी तिची वीण घट्ट केली. या सगळ्या प्रक्रियेतून कविता लिहिताना सुर्वे यांनी व्यवस्थेलाच प्रश्न विचारले. त्यामुळेच त्यांची कविता आजही तितकीच जिवंत आणि सर्वकालीन वाटते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कविवर्य नारायण सुर्वे या दोन युगपुरुषांच्या विचारांच्या छायेखाली हे संमेलन होत आहे, ही बाब कार्यक्रमाचे औचित्य अधिक गडद करणारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण यांनी कविवर्य नारायण सुर्वे यांची कविता वाचून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंचचे अध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील, प्रेमानंद रावराणे आदी उपस्थित होते.
कवयित्री तांबे म्हणाल्या, “सुर्वे यांचे वैभववाडीशी असलेले नाते केवळ भौगोलिक नाही, तर ते आत्मिक आहे. वैभववाडी-हेत हे त्यांचे मूळ गाव आहे. कोकणातील माती जशी वरून कठीण आणि आतून पाझरणारी असते, तसाच सुर्वे यांच्या कवितेचा बाज आहे. वरून वास्तववादी, आक्रमक आणि अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारा; मात्र आतून माणसाविषयीची अथांग करुणा भरलेला आहे.”
‘माझे विद्यापीठ’, ‘जाहीरनामा’, ‘सनद’ आणि ‘ऐसे गा मी ब्रह्म’ या काव्यसंग्रहांनी कष्टकरी तसेच शोषित-वंचित समाजाला स्वाभिमानाचा आवाज दिल्याचेही त्यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण म्हणाले, “कविता बोलते तीच कवीची भाषा असते. कवीचा अनुभव कवितेतून बोलत असतो. उत्तम कविता लिहिण्यासाठी प्रचंड वाचन आणि तीक्ष्ण निरीक्षणशक्ती आवश्यक असते. समाजातील दुःख कवी आपल्या शब्दांतून मांडत असल्याने तो दुःखाचाही भाष्यकार असतो.”
“आपल्या आयुष्यात मातृभाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मातृभाषेची संस्कृती जपली गेली पाहिजे आणि हे महत्त्वाचे काम कवी व साहित्यिक करत असतात. दक्षिणेकडील राज्यांनी साहित्यिकांचा आदर जपत आपापल्या भाषेचे संवर्धन केले आहे. भाषेमुळेच कलावंताचे व्यक्तिमत्त्व घडते, हे नव्या पिढीतील कवींनी लक्षात ठेवावे,” असेही ते म्हणाले.

पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर म्हणाले, “कौतुकास्पद असा हा साहित्यिक कार्यक्रम आहे. कवितेमुळे समाजात उत्तम सांस्कृतिक वातावरण निर्माण होते. वैभववाडीत असे सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यासाठी अक्षरवैभवसारखी संस्था कार्यरत आहे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. संत बहिणाबाईंच्या कवितांमधून जशी प्रेरणा मिळते, त्याचप्रमाणे या कार्यक्रमातून नवोदित कवींनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास वाटतो.”
कवितेसाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक असून, अशा साहित्यिक कार्यक्रमांतून नव्या कवींना मार्गदर्शनाची संधी मिळते, असेही सोनवलकर यांनी सांगितले. यावेळी प्रेमानंद रावराणे यांनीही आपले विचार व्यक्त केले.

उद्घाटन सत्रानंतर नव्या-जुन्या कवींचे कवीसंमेलन रंगतदार झाले. यामध्ये सीमा म्हस्के, जयवंत मोरे, मधुकर मातोंडकर, हरिश्चंद्र भिसे, प्रेमानंद रावराणे, सचिन तळेकर, निशिगंधा गावकर, सत्यवान साटम, अजिंक्य जाधव, जयकुमार पाटील, स्वप्निल पाटील, हनुमंत सुतार, स्नेहल रावराणे, नेहा पवार, पूजा सावंत, समृद्धी जाधव, अक्षरा पांचाळ, प्राची पांचाळ, योगेश सकपाळ, सचिन भास्कर, धैर्य बोडेकर आणि शुभ्रा सावंत आदी कवींनी आपल्या कविता सादर करून रसिकांची दाद मिळविली.

error: Content is protected !!