चालकांना कल्याण योजनांचे कवच

जिल्ह्यात ३४३ जणांची नोंदणी; २९ ज्येष्ठ चालकांना प्रत्येकी दहा हजारांचा सन्मान निधी

ओरोस (प्रतिनिधी) : प्रवासी वाहतूक व्यवसायात वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या ऑटो-रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षेचे कवच देण्यासाठी स्थापन केलेल्या ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळा’ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३४३ चालकांनी मंडळाकडे सभासद नोंदणी केली असून, त्यापैकी १७२ अर्ज मंजूर झाले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील २९ ज्येष्ठ चालक प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या सन्मान निधीसाठी पात्र ठरले आहेत.

राज्य शासनाच्या परिवहन विभागामार्फत हे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. प्रवासी वाहतूक क्षेत्रातील चालकांना जीवनविमा, अपघात विमा, आरोग्यविषयक लाभ, कर्तव्य बजावताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, कौशल्यवृद्धी यांसह विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मंडळामार्फत दिला जात आहे.

जिल्ह्यात मंडळाच्या सभासद नोंदणीला वाढता प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ३४३ चालकांनी नोंदणी केली आहे. प्राप्त अर्जांपैकी १७२ अर्जांना मंजुरी मिळाली असून सध्या कोणताही अर्ज प्रलंबित नसल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली.

२९ ज्येष्ठांचा गौरव
प्रवासी वाहतूक क्षेत्रात अनेक वर्षे सेवा बजावलेल्या ज्येष्ठ चालकांच्या योगदानाची दखल घेत शासनाने त्यांच्यासाठी सन्मान निधीची तरतूद केली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २९ ज्येष्ठ चालक या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. प्रत्येक पात्र चालकाला दहा हजार रुपयांचा सन्मान निधी देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र ऑटो-रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांनी मंडळाचे सभासदत्व स्वीकारून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी केले आहे.

“प्रवासी वाहतूक चालकांसाठी शासनाने विविध सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्ह्यातील पात्र ऑटो-रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांनी मंडळाचे सभासदत्व स्वीकारून या योजनांचा लाभ घ्यावा.”
— विजय काळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग

error: Content is protected !!