संविता आश्रमला धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे दान
खारेपाटण (प्रतिनिधी) : रासाई युवा कला-क्रीडा मंडळ, सावंतवाडी यंदा नवरात्रोत्सवाचे २७ वे वर्ष साजरे करत आहे. गेली २७ वर्षे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या मंडळाने यंदाही सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. नवरात्रोत्सवाच्या काळात जमा झालेल्या धान्य व वस्तूंपैकी काही धान्य आणि जीवनावश्यक वस्तू मंडळाच्या वतीने जीवन आनंद संस्थेच्या संविता आश्रमातील निराधार बांधवांसाठी दान स्वरूपात देण्यात आल्या.
नवरात्रोत्सवाच्या आनंदा सोबतच समाजातील गरजू व निराधार व्यक्तींच्या सेवेतही आपले योगदान असावे, या भावनेतून मंडळाने हा उपक्रम राबविला. उत्सवातून निर्माण झालेल्या सामाजिक सहकार्याची भावना सेवाकार्यापर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे. या सामाजिक उपक्रमाबद्दल जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे तोंडभरून कौतुक केले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष कृष्णा लाखे, सचिव सागर लाखे, उपाध्यक्ष विकी लाखे, खजिनदार लखन पाटील, उपखजिनदार अंकुश लाखे, कार्याध्यक्ष रोहित लाखे, कार्यकर्ते गणेश खोग्राडे, नितीन पाटील, पवन पाटील, सुनील पाटील तसेच ज्येष्ठ मान्यवर चंद्रकांत लाखे आदी उपस्थित होते.दानवस्तू प्रदान करण्यासाठी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात संविता आश्रमचे उपव्यवस्थापक आशिष कांबळी, भक्ती परब आणि हर्षद हळदणकर यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून धान्य व वस्तूंचा स्वीकार केला.
मंडळाच्या २७ वर्षांच्या उत्सव परंपरेला सामाजिक सेवेची जोड देणारा हा उपक्रम कौतुकास्पद असून, रासाई युवा कला-क्रीडा मंडळाने सामाजिक बांधिलकीची जपलेली भावना इतर मंडळांसाठीही प्रेरणादायी आहे. तर सावंतवाडी येथील रासाई युवा कला -क्रीडा मंडळ सावंतवाडी याच्या कडून नवरात्रीच्या दिवसात मिळालेल्या धान्य व वस्तू पैकी काही धान्य व वस्तु आश्रमला दान स्वरूपात दिल्या.












